नाशिक जिल्ह्यात विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या कार्यक्रमांमध्ये लोकप्रतिनिधींची नावे प्रोटोकॉलनुसार घेतली जात नसल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या मुद्द्यावरून शिवसेनेचे आमदार किशोर दराडे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा नियोजन बैठकीत दराडे आणि शरद पवार गटाचे खासदार भास्कर भगरे यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तक्रार केली आहे.
अधिकाऱ्यांवर दबावाचा आरोप
अधिकाऱ्यांवर दबाव आणला जातो आणि बदलीच्या धमक्या दिल्या जातात, असा आरोप दराडे यांनी केला आहे. येवल्यात विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाच्या वेळी जाणूनबुजून लोकप्रतिनिधींची नावे टाकली जात नसल्याचे दराडे म्हणाले. मंत्री भुजबळ हे अधिकाऱ्यांना हाताशी धरून राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकप्रतिनिधी असूनही नावे घेतली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
खासदार भगरेंचीही तक्रार
खासदार भास्कर भगरे यांनीही या मुद्द्यावर तक्रार केली आहे. विरोधात असलो तरी लोकांचे काम करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो, असे भगरे म्हणाले. अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी आणि पालकमंत्र्यांकडे केली. यासंदर्भात लेखी निवेदनही देण्यात आले आहे. दराडे यांनी येवल्यात सूडाचे राजकारण केले जात असल्याचा आरोप केला असून, अधिकाऱ्यांनी दबावाखाली काम केले तर हक्कभंग आणण्याचा इशाराही दिला आहे. महायुतीत असूनही भुजबळ आणि दराडे यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आल्याने नाशिकमधील राजकीय वातावरण तापले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा