, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

बीडमध्ये सिल्क साडी उद्योग; १० वर्षांत ‘सिल्क बीड’ ओळख

जालनाच्या धर्तीवर बीडमध्ये रेशीम उद्योगाला चालना मिळणार आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी सिल्क साड्या तयार करणारा प्रकल्प उभारण्याची संकल्पना मांडली आहे.

बीडमध्ये सिल्क साडी उद्योग; १० वर्षांत ‘सिल्क बीड’ ओळख

जालना जिल्ह्याच्या धर्तीवर आता बीड जिल्ह्यातही रेशीम उद्योगाला चालना देण्याची तयारी सुरू झाली आहे. रेशीम धाग्यापासून आकर्षक सिल्क साड्यांची निर्मिती करण्यासाठी जिल्ह्यात स्वतंत्र वस्त्रोद्योग प्रकल्प उभारण्याची संकल्पना जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी मांडली आहे. रेशीम उत्पादनापासून साडी निर्मितीपर्यंतची संपूर्ण साखळी बीडमध्ये विकसित करण्याचे नियोजन असून, आगामी नऊ ते दहा वर्षांत ‘सिल्क बीड’ अशी जिल्ह्याची नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन

बीड येथील वेदभवनमध्ये बुधवारी, ता. २५ रोजी जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने केंद्र सरकारच्या सिल्क समग्र-२ योजनेंतर्गत निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना जिल्हाधिकार्यांनी रेशीम शेतीला केवळ शेतीपूरक व्यवसाय न ठेवता त्याला औद्योगिक स्वरूप देण्याची गरज अधोरेखित केली. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील २०० हून अधिक गावांमध्ये तुती लागवड, रेशीम उत्पादन आणि फळबाग लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. या उत्पादनाला वस्त्रोद्योगाची जोड मिळाल्यास शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत उपलब्ध होण्याबरोबरच ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले.

महिलांना रोजगार आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचा नवा स्रोत

रेशीम धाग्यापासून सिल्क साड्या तयार करण्यासाठी स्थानिक पातळीवर उद्योग उभारल्यास महिलांसाठी वस्त्रनिर्मिती, शिवणकाम आणि इतर संबंधित क्षेत्रांत रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्पष्ट केले. रेशीम शेतीच्या विस्तारासाठी पाण्याचे योग्य नियोजन, जलसंधारण आणि जलव्यवस्थापनाला प्राधान्य देण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी व्हीबी-जी-राम-जी योजनेच्या माध्यमातून रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्याची ग्वाही दिली. तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी सोडविण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात रेशीम विकास अधिकारी शंकर वराट यांनी दुष्काळी परिस्थितीत तुती लागवड आणि संगोपनासाठी आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती दिली. प्रशिक्षणार्थींना पाच दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार असून, ३० नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत गडहिंग्लज येथील अंडीपुंज केंद्रावर दोन दिवसीय अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांचा शुभेच्छा संदेश यावेळी वाचून दाखविण्यात आला.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance