रत्नागिरी–कोल्हापूर महामार्गावर शुक्रवारी रात्री एका बिबट्याला अज्ञात वाहनाची जोरदार धडक बसली. हातखंबा नजीकच्या चांद-सूर्या पॉईंट परिसरात रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. रस्ता ओलांडत असलेल्या बिबट्याला वेगाने जाणाऱ्या वाहनाने धडक दिल्यानंतर तो गंभीर जखमी झाला. धडकेनंतर बिबट्याने महामार्गालगत असलेल्या मलुष्टे यांच्या बागेत धूम ठोकली. जखमी अवस्थेत बिबट्या नागरी वस्तीजवळील बागेत शिरल्याची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली.
बागेत शिरल्याने परिसरात खळबळ
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. अंधार आणि वाढती गर्दी यामुळे बिबट्या बिथरू शकतो, ही शक्यता लक्षात घेऊन स्थानिकांनी तातडीने वनविभागाला माहिती दिली. बिबट्या बागेतील दाट झाडीत निघून गेल्याने त्याचा ठावठिकाणा समजणे कठीण झाले होते. बाग नागरी वस्तीजवळ असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
पिंजरा लावून शोधमोहीम
घटनेचे गांभीर्य ओळखून वनविभागाचे पथक पिंजरा आणि आवश्यक बचाव साहित्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. वनकर्मचाऱ्यांनी सर्वप्रथम बघ्यांची गर्दी बाजूला सारून बागेच्या सभोवताली शोधमोहीम हाती घेतली. वाहनाच्या धडकेमुळे बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने तो फार लांब जाऊ शकत नाही आणि बागेतीलच झाडीझुडपांत लपून बसला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. अंधार आणि दाट झाडी यामुळे बचाव कार्यात अडथळे येत असले तरी बिबट्याला कोणतीही इजा न होता आणि त्याचा कोणालाही उपद्रव न होता त्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावून विशेष मोहीम राबवली जात आहे. रात्री उशिरापर्यंत वनविभागाचे बचाव कार्य सुरू होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा