, २८ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

डिलिमिटेशनला विरोध नाही, पण ८५० जागांना विरोध: चव्हाण

पृथ्वीराज चव्हाण यांनी डिलिमिटेशन विधेयकावर काँग्रेसची भूमिका मांडली. परिसीमनाला विरोध नाही, पण लोकसभेच्या ८५० जागांना विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

डिलिमिटेशनला विरोध नाही, पण ८५० जागांना विरोध: चव्हाण

केंद्रातील भाजप सरकारनं २९ नोव्हेंबरला विशेष अधिवेशन बोलावलं असून डिलिमिटेशन विधेयकावरून देशातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये जोरदार घडामोडी सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पंतप्रधान कार्यालयाचे माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली. कराडमधील निवासस्थानी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

मागच्या दारानं विधेयक आणल्याचा आरोप

कोणालाही विश्वासात न घेता, मागच्या दारानं लपून छपून विधेयक आणलं जात असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. केंद्रातील भाजप सरकारनं २९ नोव्हेंबरला विशेष अधिवेशन बोलावलं आहे. संसदेचं पावसाळी अधिवेशन अद्याप स्थगित न केल्यामुळे सरकारला नवीन अधिवेशन बोलावता आलं. त्यामुळे हे हिवाळी अधिवेशन नसून पावसाळी अधिवेशनाचाच पुढील टप्पा आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. डिलिमिटेशन विधेयकाचा मसुदा पाहिल्याशिवाय अंतिम भूमिका घेता येणार नाही, असं चव्हाण म्हणाले. काँग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध नाही, परिसीमन करायचं असेल तर करा. परंतु, राज्यांची तुलनात्मक जागांची संख्या बदलून कोणत्याही राज्यावर अन्याय होणार असल्यास त्याला काँग्रेसचा नक्कीच विरोध आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. महिला आरक्षण आणण्यासाठी डिलिमिटेशन करत असल्याचा केंद्रातील भाजप सरकारचा दावा ही निव्वळ बोगसगिरी आणि खोटारडेपणा असल्याची टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

परिसिमनाचा इतिहास आणि दक्षिणेकडील राज्यं

लोकसभेची सदस्य संख्या ५४३ वरून ८५० झाली तर साखर कारखान्याच्या सभेसारखं चहा, लाडू-चिवडा खा आणि निघून जा, अशी संसदेची अवस्था होईल, अशी टीकाही त्यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी जुन्या घटनांचा दाखला देताना सांगितलं की, परिसिमन ही घटनात्मक प्रक्रिया आहे. १९५१, १९६१ आणि १९७१ च्या जनगणनेनंतर परिसिमन झालं होतं. प्रत्येक जनगणनेनंतर राज्यांच्या लोकसभेतील जागांची तुलनात्मक संख्या बदलत राहिल्यास दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय होईल. म्हणून १९७६ मध्ये इंदिरा गांधी यांनी १९७१ च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागांची संख्या २५ वर्षांसाठी गोठवण्याचा निर्णय घेतला. २००१ मध्ये हा कालावधी संपल्यानंतर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी आणखी २५ वर्षांसाठी जागा गोठवण्याचा निर्णय कायम ठेवला होता. अन्यथा दक्षिणेकडील राज्यांवर अन्याय झाला असता, असं चव्हाण म्हणाले. १९७६ मध्ये ठरलेली लोकसभेची संख्या अजूनही गोठवून ठेवावी, ही आमची मागणी आहे. ही संख्या ५४३ च राहावी, ८५० केली तर लोकसभेला काही अर्थ राहणार नाही, असं चव्हाण म्हणाले. काँग्रेसचा डिलिमिटेशनला विरोध नाही, कारण ही घटनात्मक तरतूद आहे. मात्र लोकसभेच्या जागा वाढवण्याला त्यांचा विरोध असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

विशाल राजपूत

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance