९९ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीत आनंदाचे वातावरण होते. मात्र प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केल्याने वाद निर्माण झाला. या वादात आता मराठी अभिनेते अजय पुरकर यांनीही उडी घेतली असून त्यांनी अनुराग कश्यप यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
पुरकरांचा कश्यपवर घणाघात
सप्टेंबर २०२६ मध्ये फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने संतोष डावखर दिग्दर्शित गोंधळ या मानसशास्त्रीय थरारपटाची २०२७ च्या ऑस्कर पुरस्कारांसाठी निवड केली. यावर प्रतिक्रिया देताना अनुराग कश्यप यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की भारताला ऑस्कर मिळत नाही, कारण चुकीच्या चित्रपटांची निवड केली जाते. निवड प्रक्रियेत राजकारण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागरूकतेचा अभाव असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. यावर अजय पुरकर यांनी एका पॉडकास्ट मुलाखतीत उत्तर दिले. तुझेही चित्रपट कान्स किंवा ऑस्करला गेले आहेत, मग ऑस्करचे इतके महत्त्व का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. माझे लोक माझे चित्रपट पाहतात, हेच माझ्यासाठी सर्वांत मोठे आहे. मी चित्रपट माझ्या लोकांसाठी बनवतो, ऑस्करवाल्यांसाठी नाही, असे ते म्हणाले. भारतीय संस्कृती दाखवली की या लोकांच्या पोटात दुखते, कारण घाणेरडे चित्रपट बनवण्याची त्यांची वृत्ती आहे, असेही त्यांनी कॅमेरासमोर सांगितले.
गोंधळच्या निवडीचा अभिमान
गोंधळची ऑस्करसाठी निवड झाली याचा मला सार्थ अभिमान आहे, असे अजय पुरकर यांनी सांगितले. हा चित्रपट कशाला पाठवला, असे बोलणारे अत्यंत फालतू लोक आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, गोंधळचे दिग्दर्शक संतोष डावखर यांनीही या वादावर आपली बाजू मांडली होती. हा चित्रपट अद्याप कोणत्याही ओटीटी व्यासपीठावर प्रदर्शित झालेला नाही आणि मुंबईतही मोठ्या प्रमाणावर झळकलेला नाही. त्यामुळे चित्रपट न पाहता किंवा मनात कोणताही पूर्वग्रह ठेवून मत बनवण्यापूर्वी समीक्षक आणि चित्रपटसृष्टीतील मान्यवरांनी आधी हा चित्रपट पाहावा, अशी विनंती त्यांनी केली होती. महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कथानकामुळेच या चित्रपटाची निवड झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.
प्रतिक्रिया व्यक्त करा