शौचावाटे रक्त जाणे ही कोणासाठीही चिंतेची बाब असते. पण जेव्हा रक्तासोबत कोणतीही वेदना होत नाही, तेव्हा अनेकजण ती गोष्ट सहजपणे दुर्लक्षित करतात. तज्ज्ञांच्या मते, वेदना नसली तरी शौचातून रक्त येणे हे नेहमीच किरकोळ असते असे नाही. काही वेळा यामागे सामान्य कारण असते, तर काही वेळा पचनसंस्थेच्या गंभीर आजाराचे हे पहिले लक्षण असू शकते. त्यामुळे अशी लक्षणे वेळीच ओळखणे आणि योग्य तपासणी करून घेणे गरजेचे ठरते.
वेदना न होता रक्त येण्याची चार प्रमुख कारणे
मूळव्याध हे यामागचे सर्वात सामान्य कारण आहे. गुदद्वाराजवळील किंवा आतल्या रक्तवाहिन्या सुजल्याने मूळव्याध होतो. टॉयलेट पेपरवर, कमोडमध्ये किंवा शौचावर चमकदार लाल रक्त दिसू शकते. आतल्या मूळव्याधीत अजिबात वेदना होत नाहीत, त्यामुळे अनेकजण त्याकडे लक्ष देत नाहीत.
डायव्हर्टिक्युलर आजारात मोठ्या आतड्याच्या भिंतीत लहान पिशव्यांसारखे कप्पे तयार होतात. त्यातील एखाद्या रक्तवाहिनीतून अचानक, वेदना न होता रक्तस्त्राव सुरू होऊ शकतो.
कोलन पॉलिप्स म्हणजे मोठ्या आतड्याच्या आतील आवरणावर तयार होणाऱ्या लहान गाठी. बहुतेक पॉलिप्सची कोणतीही लक्षणे नसतात, पण काहींमधून अधूनमधून रक्त येते. काही प्रकारचे पॉलिप्स वेळेत काढले नाहीत, तर कालांतराने त्यांचे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकते.
कोलोरेक्टल कॅन्सर हेही एक कारण असू शकते. काही रुग्णांमध्ये वेदना न होता शौचातून रक्त जाणे हे मोठ्या आतड्याच्या किंवा गुदाशयाच्या कॅन्सरचे सुरुवातीचे लक्षण असते. व्यक्तीला आजारी असल्याची कोणतीही जाणीव नसतानाही रक्तस्त्राव होऊ शकतो.
‘फक्त मूळव्याध आहे’ हा गैरसमज टाळा
आकडेवारीनुसार, रक्तस्त्राव होणाऱ्या सुमारे ९० टक्के रुग्ण हा त्रास केवळ मूळव्याध समजून त्यावरच उपचार करत राहतात. जर यामागचे खरे कारण कॅन्सर असेल, तर अचूक निदान होण्यास मोठा विलंब होतो. ‘वेदना होत नाहीत म्हणजे आजार किरकोळ आहे’ हा विचार पूर्णपणे चुकीचा आहे, असे तज्ज्ञ सांगतात. पचनसंस्थेचे काही गंभीर आजार सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही वेदना देत नाहीत. त्यामुळे शौचातून रक्त गेल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि गरज पडल्यास कोलोनोस्कोपीसारखी तपासणी करून घेणे हाच सुरक्षित मार्ग आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा