रस्त्यावर भटकणाऱ्या कुत्र्यांची दहशत आता इतकी वाढली आहे की बदलापूरमध्ये एका १८ वर्षाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. भटक्या कुत्र्याचा पाठलाग चुकवण्यासाठी धावणाऱ्या हर्षल शिंदे याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
हर्षल बदलापूर पश्चिमेच्या शनीनगर परिसरात मित्रांना सोडण्यासाठी गेला होता. याचवेळी एक महिला भटक्या कुत्र्यांना तिथे खायला घालत होती. त्यावेळी तिथलाच एक भटका कुत्रा हर्षल आणि त्याच्या मित्राच्या मागे लागला. कुत्र्यापासून वाचण्यासाठी हर्षलने जीवाच्या आकांताने पळ काढला आणि परिसरातील एका दुकानात आश्रय घेतला. मात्र जोरात पळाल्याने त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.
बदलापुरात भटक्या कुत्र्यांची संख्या १५ हजारांवर
या धक्कादायक प्रकाराने भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. ही घटना घडल्यानंतर जाग आलेल्या पालिका प्रशासनाने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले आहे. बदलापूरसारख्या शहरातलीच भटक्या कुत्र्यांची संख्या सध्या १५ हजारांवर गेली आहे. राज्यात अनेक ठिकाणी भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांच्या घटना सातत्याने घडत आहेत. लहान मुलांवरील कुत्र्यांचा हल्ला हा तर नेहमीचाच विषय झाला आहे. तरीही याकडे कुणी गांभीर्याने पाहात असताना दिसत नाही.
ठोस उपाययोजना होणार की प्रश्न तसाच राहणार?
या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खरोखरच राज्य पातळीवर ठोस उपाययोजना होणार की सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरूच राहणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा