कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वेगाने वाढत असताना रोजगारावर त्याचा काय परिणाम होईल, यावरून एक नवा अहवाल चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी कर्मचारी कपातीचा सपाटा लावला आहे. त्यातच आता येत्या पाच वर्षांत जगभरातील कोट्यवधी लोकांच्या रोजगारांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भविष्यात अनेक कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवतील आणि त्याचा थेट परिणाम नोकर कपातीवर होईल, असा दावा जेपी मॉर्गनने आपल्या अहवालात केला आहे.
अहवालात नेमकं काय म्हटलंय?
अहवालानुसार, येत्या पाच वर्षांत सरासरी तब्बल २ कोटी ४० लाख नोकऱ्यांवर परिणाम होईल. मात्र हा बदल बहुतेक वेळा लोकांना नोकरीवरून काढण्याच्या स्वरूपात नसेल. रिक्त झालेली पदं पुन्हा न भरण्याच्या स्वरूपात हा बदल अधिक दिसू शकतो, असं अहवालात म्हटलं आहे. नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याऐवजी कंपन्या कृत्रिम बुद्धिमत्तेवरील खर्च वाढवू शकतात. नोकऱ्या पूर्णपणे संपण्यापेक्षा कामाच्या स्वरूपात बदल होण्याची शक्यता अधिक असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा वेग वेगवेगळा असू शकतो, त्यामुळे अचानक मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाण्याचा धोका कमी असू शकतो, असं अहवालाचं म्हणणं आहे.
कंपन्यांचा कल काय सांगतो?
भविष्यात कामाचा वेग आणि उत्पादकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर करावा लागणार असल्याचं अहवालात म्हटलं आहे. आधीच जगभरातील तंत्रज्ञान कंपन्यांकडून वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेला प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे एकूणच कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे अनेकांवर बेरोजगारीची टांगती तलवार असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. तरीही नोकऱ्या एकदम नाहीशा होण्याऐवजी कामाचं स्वरूप बदलत जाईल, अशी शक्यता अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा