भाजपने आपली संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी ‘सेवादूत’ मोहीम हाती घेतली आहे. १ ते २५ डिसेंबर २०२६ या कालावधीत पक्षाचे आमदार आणि ज्येष्ठ नेते आपापल्या विधानसभा मतदारसंघाबाहेर जाऊन दुसऱ्या भागांत २५ दिवस मुक्काम करणार आहेत. या काळात ते स्थानिक जनतेशी थेट संवाद साधणार असून, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय कार्यशाळा
मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा विभागीय कार्यशाळा झाली. या कार्यशाळेला भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित राहिले. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. कार्यशाळेत मोहिमेचे सूक्ष्म नियोजन, कार्यपद्धती आणि प्रभावी अंमलबजावणी यावर सविस्तर चर्चा झाली.
यावेळी बोलताना चव्हाण यांनी सांगितले की, समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडीअडचणी व समस्या जाणून घेणे, त्यांना आवश्यक ते सहकार्य करणे आणि सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे, हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यशाळेला भाजपाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, खासदार डॉ. भागवत कराड, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, आमदार विक्रांत पाटील, माजी आमदार संजय केनेकर यांच्यासह मराठवाडा विभागातील जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बूथ बळकटीवर भर
या मोहिमेदरम्यान गोळा केलेली माहिती आणि स्थानिक रहिवाशांकडून मिळालेला अभिप्राय थेट संघटनेकडे सादर केला जाईल. त्याच्या आधारे पक्ष कमकुवत बूथ आणि संघटनात्मक उणिवा ओळखून त्यांना मजबूत करण्यासाठी रणनीती तयार करेल. या मोहिमेचा उद्देश केवळ सेवा उपक्रम राबवणे हा नाही, तर सेवा, जनसंपर्क आणि संघटनात्मक विस्तार एकाच वेळी साधणे हा आहे. २५ दिवसांच्या या मोहिमेद्वारे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग वाढवणे, तसेच तळागाळातील उपस्थिती मजबूत करणे, हे पक्षाचे उद्दिष्ट आहे. मोहिमेच्या शुभारंभापूर्वी भाजपने तयारीला वेग दिला असून, कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या समजावून सांगण्यासाठी आणि प्रचाराची रूपरेषा स्पष्ट करण्यासाठी राज्याच्या तीन विभागांमध्ये कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा