थंडीच्या दिवसांत हात-पाय दुखण्याची आणि सांधे आखडण्याची तक्रार अनेकांना जाणवते. थंड वारा सहन न झाल्याने हात-पाय आखडल्यासारखे वाटतात, गुडघ्यात दुखते आणि शरीर हलवण्यास त्रास होतो. ज्यांना आधीपासून सांधेदुखीचा त्रास आहे, त्यांच्यासाठी हे दिवस अधिक कठीण जातात.
सकाळी अंथरुणातच करा या हालचाली
रात्री बराच वेळ एकाच स्थितीत झोपल्याने सकाळी उठेपर्यंत शरीराची हालचाल कमी राहते. त्यामुळे अंथरुणातून लगेच बाहेर पडण्याऐवजी आधी काही सोप्या हालचाली कराव्यात. पाय सरळ ठेवून पायांची बोटे हळूहळू स्वतःकडे खेचा आणि मग पुढे सरळ करा. असे काही वेळा केल्याने पाय आणि घोट्यांमध्ये हालचाल निर्माण होते आणि ताठरपणा कमी होण्यास मदत होते. त्यानंतर पलंगावर झोपून एक पाय हळूवारपणे वाकवा आणि सरळ करा; हीच हालचाल दुसऱ्या पायानेही करा. हालचाल करताना दुखत असल्यास जबरदस्ती करू नका. हिवाळ्यात सकाळी बोटांमध्ये ताठरपणा जाणवतो, त्यासाठी मुठी हळुवारपणे बंद करा आणि उघडा, तसेच मनगट गोलाकार फिरवा. या सोप्या व्यायामाने हात सक्रिय होण्यास मदत होते.
दिवसभर सांधे सक्रिय ठेवा
अंथरुणातून उठल्यावर शरीराला थोडा वेळ द्या. मान, खांदे, हात आणि पाय हळुवारपणे ताणा. जास्त वेळ एकाच जागी बसणे किंवा झोपणे टाळा; दिवसभर थोडे थोडे चालणे आणि हलके व्यायाम केल्याने सांधे सक्रिय राहण्यास मदत होते. सकाळी सांध्यांमध्ये तीव्र वेदना आणि ताठरपणा जाणवत असेल, तर गरम पाण्याच्या पिशवीने कोमट शेक देऊन पाहता येईल; यामुळे स्नायू शिथिल होऊन ताठरपणा कमी होऊ शकतो. ही माहिती प्राथमिक स्वरूपाची असून, कोणताही प्रयोग करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा