मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी फेम शर्मिष्ठा राऊत तिच्या अभिनयाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. पहिल्या लग्नाचा दहा वर्षांचा संसार मोडल्यानंतर शर्मिष्ठाने आयुष्याला नव्याने सुरुवात केली. ऑक्टोबर 2020 मध्ये तिने तेजस देसाईसोबत दुसरे लग्न केले. विशेष म्हणजे दोघांचेही हे दुसरे लग्न असून त्यांचे अरेंज्ड मॅरेज होते. मात्र या लग्नामागची कहाणी एखाद्या चित्रपटापेक्षा कमी नाही.
शर्मिष्ठा राऊतचा 2018 मध्ये पहिला घटस्फोट झाला होता. जवळपास दहा वर्षांचा संसार संपल्यानंतर तिने पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी तिने आपल्या आई-वडिलांशी चर्चा केली होती. कुटुंबीयांकडून तिच्यासाठी स्थळ शोधण्यास सुरुवात झाली आणि त्यातूनच तेजस देसाईचे स्थळ समोर आले. शर्मिष्ठाने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगितले आहे.
पहिल्याच भेटीत लग्नाचा प्रस्ताव
तेजस देसाईने मुलाखतीत सांगितले की, 18 ऑगस्ट 2019 ला रात्री त्याला शर्मिष्ठाचे स्थळ आले होते. त्यावेळी तो एका इव्हेंटला गेला होता. तिथे त्याच्या भावाचा आणि शर्मिष्ठाच्या बहिणीचा एक कॉमन फ्रेंड होता. त्याच कार्यक्रमात शर्मिष्ठा पाहुणी म्हणून आली होती. त्या मित्राने शर्मिष्ठाच्या बहिणीला विचारले की, शर्मिष्ठाने पुढे काय विचार केलाय. तिच्या बहिणीने तिच्यासाठी स्थळ बघतोय असे सांगितले. मग तो म्हणाला की, या इव्हेंटचा ऑर्गनायझर श्रेयस आहे, त्याचा मोठा भाऊ तेजस आहे. त्याचाही घटस्फोट झाला आहे आणि तोही लग्नाचे स्थळ बघत आहे.
त्यानंतर तेजसला त्याच्या आई आणि भावाचा फोन आला. त्यांनी सांगितले की, शर्मिष्ठा राऊतचे स्थळ आले आहे. तेजसने सांगितले की, त्यावेळी शर्मिष्ठा राऊत ही व्यक्ती त्याला माहीत नव्हती. त्याने बिग बॉसचा एकही एपिसोड पाहिला नव्हता आणि त्याचा मालिकांशी फारसा संबंध नव्हता. घरच्यांनी तिच्याबद्दल सर्च करायला सांगितल्यावर त्याने सांगितले की, त्याला अभिनेत्रीशी लग्न करायचे नाही. तिला असलेले नखरे आणि तो ऑरा आपल्याला झेपणार नाही, असे त्याला वाटले होते.
सुरुवातीला दोघांनीही एकमेकांना भेटण्यास फारसा उत्साह दाखवला नव्हता. मात्र काही मित्रांनी तेजसला शर्मिष्ठा चांगली आणि साधी मुलगी असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याने तिला भेटण्याचे ठरवले. दोघांची पहिली भेट झाली. त्यांनी एकत्र जेवण केले, त्यानंतर क्लबमध्ये जाऊन डान्सही केला. शर्मिष्ठाला घरी सोडायला गेल्यानंतर तेजसने थेट तिच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र शर्मिष्ठाने लगेच होकार दिला नाही. तिने विचार करण्यासाठी वेळ मागितला आणि मी फोन करेन, तू फोन करू नकोस, असे त्याला स्पष्ट सांगितले.
लिव्ह-इननंतर लग्नाचा निर्णय
काही दिवसांनी शर्मिष्ठाने तेजसला फोन केला आणि आधी मित्र म्हणून एकमेकांना जाणून घेऊया, असे सांगितले. त्यानंतर दोघे सलग आठ ते दहा दिवस भेटत राहिले. हळूहळू त्यांच्यात जवळीक वाढली. शर्मिष्ठाने नात्याला होकार दिला. दोघांचाही याआधीचा वैवाहिक अनुभव चांगला नव्हता. त्यामुळे नव्या नात्यात कोणतीही घाई करायची नाही, असे त्यांनी ठरवले होते. एकमेकांना पुरेसा वेळ दिल्यानंतर शर्मिष्ठा आणि तेजस लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. करोना काळात ऑक्टोबर 2020 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. शर्मिष्ठाने सांगितले की, लग्न करताना मुलगा आपल्याला ओळखत नसेल असा असेल तर चांगले, असा निकष तिने ठेवला होता आणि तेजस त्या निकषात बसला होता.
प्रतिक्रिया व्यक्त करा