कराड तालुक्यातील मसूर येथील रहदारीच्या मुख्य चौकात चोरट्यांनी एकाच रात्रीत नऊ दुकानांना लक्ष्य केले. शुक्रवारी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास दुकानांच्या शटरची कुलपे आणि कोयंडे तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. काही दुकानांमधून रोकड आणि साहित्य लंपास करण्यात आले असून, एकूण ७२ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याची नोंद मसूर पोलीस ठाण्यात झाली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एका रात्रीत नऊ दुकानांवर हल्ला
कराड-मसूर रस्त्यावरील मुख्य चौकापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संजय चव्हाण यांच्या श्री कलेक्शन या कापड दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून ड्रॉवरमधील ५३ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. दुकानाबाहेरचा सीसीटीव्ही कॅमेराही यावेळी फोडण्यात आला. शेजारील प्रकाश राजमाने यांच्या समर्थ हार्डवेअर दुकानाचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. त्याच परिसरातील श्याम सेल्स दुकानाचे कुलूप तोडून तेथील सीसीटीव्ही कॅमेरा फोडण्याचाही प्रयत्न झाला. चोरट्यांनी कराड रस्त्याच्या बाजूला असलेल्या सोनाली कुशन दुकानालाही लक्ष्य केले, तर मोमीन आयुर्वेदिक पतंजली दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून १,२०० रुपयांची रोकड नेण्यात आली. चोरट्यांनी दुकानांबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांकडून तपास सुरू
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी श्वानपथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांचा शोध सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे. एकाच रात्रीत इतक्या दुकानांवर झालेल्या चोरीच्या प्रयत्नांमुळे मसूरमधील व्यापाऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा