अमेरिकेत जवळपास ४० टक्के भूभागावर शेती केली जाते, मात्र तिथे शेतमजुरांची कमतरता आहे. त्यात आता ट्रम्प सरकारच्या नव्या धोरणामुळे शेती व्यवसाय अडचणीत सापडला आहे. अमेरिकेतील ३० हजार भारतीय शेतमजुरांनी काम सोडले आहे. यापैकी अनेक मजुरांकडे अमेरिकेत राहण्याची आणि काम करण्याची पूर्ण कागदपत्रे नाहीत. त्यामुळे इमिग्रेशन एजन्सी आयसीईच्या छाप्यांची आणि पकडले जाण्याची भीती असल्याने ते शेतांमध्ये काम करण्याचे टाळत आहेत.
मजुरांची कमतरता आणि छाप्यांचा परिणाम
अमेरिकेत आवश्यक कागदपत्रांशिवाय राहणाऱ्या सुमारे ७.५ लाख भारतीयांपैकी जवळपास एक लाख जण शेतीशी संबंधित कामे करतात. ट्रम्प सरकारची इमिग्रेशन एजन्सी आयसीईने ग्रामीण भागांत आणि शेतांमध्येही छापेमारी सुरू केली आहे. त्यामुळे कॅलिफोर्नियापासून कॅन्ससपर्यंत अनेक ठिकाणी शेतांमध्ये मजुरांची कमतरता जाणवत आहे. गेल्या दोन महिन्यांत हजारो शेतमजुरांना पकडून नजरकैद केंद्रांमध्ये ठेवण्यात आले आहे. काही लोकांना देशाबाहेरही पाठवण्यात आले आहे.
शेतांमध्ये मजुरांची कमतरता भासल्यास फळे आणि भाज्यांचे उत्पादन तसेच पुरवठा प्रभावित होऊ शकतो, ज्यामुळे त्यांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. शेतांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची संख्या कमी झाल्यास पिकांची पेरणी, देखभाल आणि कापणी प्रभावित होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. याचा सर्वात मोठा परिणाम फळे-भाज्यांच्या किमतींवर होऊ शकतो.
एच-२ए व्हिसाचे नियम आणि मजुरांचे पर्याय
अमेरिकेत परदेशातून आलेल्या मजुरांना शेतमजुरी करायची असल्यास प्रामुख्याने एच-२ए व्हिसा अंतर्गत काम करावे लागते. हा एक तात्पुरता किंवा हंगामी नॉन-इमिग्रंट व्हिसा आहे. कोणताही परदेशी मजूर स्वतःहून या व्हिसासाठी थेट अर्ज करू शकत नाही. अमेरिकेतील शेतकरी किंवा मालकाला आधी सरकारकडून मंजुरी घ्यावी लागते. मालकाने अर्ज मंजूर करून घेतल्यानंतरच परदेशी मजूर अमेरिकन दूतावासात एच-२ए व्हिसासाठी मुलाखत देऊन अर्ज करू शकतो.
शेतमजुरीसाठी लागणारे नियम अत्यंत कडक असल्यामुळे अनेक शेतमजूर कागदपत्रांची पूर्तता करू शकत नाहीत. आता आयसीईच्या कारवाईच्या भीतीमुळे अनेक भारतीय मजुरांनी शेतांमध्ये काम करणे कमी केले आहे. काही जण पेट्रोल पंप, किराणा दुकाने आणि इमारतींच्या बांधकामाशी संबंधित कामांमध्ये गुंतले आहेत. काही भारतीय मजूर मेक्सिकोतही गेले आहेत, मात्र तिथल्या शेतांमध्ये काम केल्यास अमेरिकेच्या तुलनेत कमी पैसे मिळतात. त्यामुळे तिथे जाणाऱ्या भारतीय शेतमजुरांचे प्रमाण कमी आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा