आजच्या धावपळीच्या जीवनात कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि आर्थिक चिंता यामुळे अनेकजण मानसिक तणावाचा सामना करत आहेत. मात्र सततचा तणाव केवळ मानसिक आरोग्यावरच नाही, तर शारीरिक आरोग्यावरही परिणाम करू शकतो. दीर्घकाळ तणावाखाली राहिल्याने टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढण्याची शक्यता असते.
तणावामुळे रक्तातील साखर का वाढते?
जेव्हा एखादी व्यक्ती तणावाखाली असते, तेव्हा शरीरात कॉर्टिसोल आणि अॅड्रेनालिन या हार्मोन्सचे प्रमाण वाढते. या हार्मोन्समुळे यकृताला अधिक ग्लुकोज रक्तात सोडण्याचे संकेत मिळतात. त्यामुळे शरीराला तणावाचा सामना करण्यासाठी अतिरिक्त ऊर्जा मिळते आणि रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. दीर्घकाळ मानसिक तणाव राहिल्यास शरीरातील इन्सुलिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. इन्सुलिन हे हार्मोन रक्तातील ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. मात्र पेशी इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देत नसतील, तर त्याला इन्सुलिन रेसिस्टन्स म्हणतात. ही स्थिती दीर्घकाळ राहिल्यास टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो. तणावात असताना काही लोक गरजेपेक्षा जास्त खातात. विशेषतः गोड पदार्थ, फास्ट फूड आणि जास्त कॅलरी असलेल्या पदार्थांचे सेवन वाढते. यामुळे वजन वाढू शकते आणि लठ्ठपणामुळे मधुमेहाचा धोका अधिक वाढतो.
तणाव कमी करण्यासाठी काय करावे?
दररोज किमान ३० मिनिटे चालणे किंवा व्यायाम करणे, नियमित ७ ते ९ तास झोप घेणे, दररोज १० ते १५ मिनिटे दीर्घ श्वसनाचा सराव करणे, आहारात फळे, भाज्या, डाळी आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करणे, तसेच गोड पदार्थ आणि प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ कमी खाणे, असे उपाय तज्ज्ञ सुचवतात. मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तातील साखर आणि HbA1c तपासणी करणेही महत्त्वाचे आहे.
केवळ मानसिक तणावामुळे मधुमेह होतो, असे नाही. आनुवंशिकता, वाढते वजन, चुकीच्या आहाराच्या सवयी, व्यायामाचा अभाव आणि वय अशा अनेक घटकांमुळे मधुमेहाचा धोका वाढतो. मात्र दीर्घकाळचा तणाव या धोक्यात भर घालू शकतो. त्यामुळे मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा