तंदुरुस्त राहण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी चालणे हा सर्वात सोपा मार्ग मानला जातो. नियमित चालल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. मात्र एक किलो वजन कमी करण्यासाठी दररोज किती पावले चालावीत, असा प्रश्न अनेकांना पडतो. याबाबत तज्ज्ञांचे काही सोपे मार्गदर्शक मुद्दे समजून घेऊया.
दररोज किती वेळ चालावे?
वजन कमी करण्यासाठी सुरुवातीला दररोज ३० ते ४० मिनिटे नियमितपणे चालणे महत्त्वाचे आहे. शारीरिक क्षमतेनुसार हळूहळू हा वेळ ४० ते ६० मिनिटांपर्यंत वाढवता येतो. म्हणजेच दररोज सुमारे ७,००० ते १०,००० पावले चालणे योग्य ठरते. ज्यांना व्यायामाची सवय नाही, त्यांनी सुरुवातीला १५ ते २० मिनिटे चालून सुरुवात करावी आणि हळूहळू वेळ वाढवावा. शरीराचे वजन, चालण्याचा वेग आणि पचनक्रिया यावर वजन कमी होणे अवलंबून असते.
आहारही तितकाच महत्त्वाचा
शरीरातील एक किलो चरबी कमी करण्यासाठी सेवन केलेल्या कॅलरीजपेक्षा सुमारे ७,७०० अधिक कॅलरीज जाळाव्या लागतात. केवळ चालल्याने वजन कमी होते, असे नाही. आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तळलेले पदार्थ, साखर आणि पॅकेज्ड फूड खाणे कमी केले पाहिजे. आहारात फळे, भाज्या आणि प्रथिने यांचा समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा