पहाटेच्या वेळी धावत्या लोकलमध्ये बिडी ओढण्यास विरोध करणाऱ्या प्रवाशावर तीन तरुणांनी धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या या हल्ल्यात उल्हासनगरचे भरत टोपले यांच्या डोळ्याच्या वर गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
विरोध केला म्हणून हल्ला
भरत टोपले हे महाराष्ट्र शासनांतर्गत सुरक्षा रक्षक मंडळात काम करतात. ते कुर्ला स्थानकावरून बीकेसी येथे नोकरीला जाण्यासाठी निघाले होते. पहाटे ४ वाजून ५७ मिनिटांनी शहाड स्थानकातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने निघालेल्या पहिल्या कसारा लोकलने ते प्रवास करत होते. याच लोकलमध्ये तीन तरुण बिडी ओढत होते. भरत टोपले यांनी लोकलमध्ये बिडी ओढणे चुकीचे असल्याचे सांगत त्यांना विरोध केला. मात्र, या विरोधाचा राग मनात धरून तरुणांनी आधी त्यांच्या दिशेने जळती बिडी फेकली. त्यानंतर ठाकुर्ली स्थानकादरम्यान त्यांच्यापैकी एकाने धारदार शस्त्राने भरत यांच्या डोळ्यावर वार केला.
जखमी प्रवाशाला रुग्णालयात दाखल; गुन्हा दाखलाची प्रक्रिया सुरू
हल्ल्यानंतर तिन्ही तरुणांनी घटनास्थळावरून पळ काढला. जखमी भरत टोपले यांना कुर्ला स्थानकात जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी ऑनलाइन तक्रार नोंदवण्यात आली आहे. तसेच डोंबिवली जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भरत टोपले हे कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे संघटनेचे शहाड प्रतिनिधी आहेत. धावत्या लोकलमध्ये अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा