टेक कंपनी एचएमडीने भारतात आपला नवा बजेट स्मार्टफोन HMD Rise लाँच केला आहे. कमी किमतीत कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सुविधा देणारा हा फोन भारतीय बाजारात दाखल झाला असून, तो फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे.
हा स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज देण्यात आले असून, त्याची किंमत ९,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. २ डिसेंबरपासून फ्लिपकार्टवर या फोनची विक्री सुरू होणार आहे. ग्राहक हा फोन इंडिगो सिल्व्हर, मिडनाईट गोल्ड आणि एमराल्ड गोल्ड या तीन रंगांमध्ये खरेदी करू शकतात.
डिस्प्ले, प्रोसेसर आणि बॅटरी
एचएमडी राईजमध्ये ६.५ इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन युनिसॉक ९८६३A चिपसेटने सुसज्ज असून, त्यात ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीने स्टोरेज १२८ जीबीपर्यंत वाढवता येणार आहे.
फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये १३ मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि फ्लॅश देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ५ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये ५,०००mAh बॅटरी देण्यात आली असून, बॉक्समध्ये चार्जरही मिळणार आहे.
AI असिस्टंट आणि सॉफ्टवेअर
हा फोन Indus AI आणि Sarvam AI असिस्टंटसह येतो. कंपनीच्या माहितीनुसार, Indus AI २२ भारतीय भाषांना सपोर्ट करते. हा स्मार्टफोन अँड्रॉईड १६ गो वर आधारित असून, दोन वर्षांपर्यंत दर तिमाहीला सिक्योरिटी पॅच अपडेट मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.
कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये ४G, यूएसबी-सी पोर्ट आणि ३.५ मिमी हेडफोन जॅक देण्यात आला आहे. हा फोन व्हॉट्सअॅप, यूट्यूब, कॉल आणि हलक्या ब्राउझिंगसाठी तयार करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा