दिवंगत उद्योगपती संजय कपूर यांच्या संपत्तीवरून सुरू असलेला कौटुंबिक वाद आता पुन्हा न्यायालयीन लढाईच्या दिशेने वळला आहे. जवळपास ३० हजार कोटी रुपयांच्या आरके फॅमिली ट्रस्टवरून संजय कपूर यांची आई राणी कपूर आणि पत्नी प्रिया सचदेव कपूर यांच्यात कायदेशीर संघर्ष सुरू आहे. हा वाद सामोपचाराने मिटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती केली होती. जवळपास १५ बैठका होऊनही दोन्ही बाजूंमध्ये कोणताही तोडगा निघू शकला नाही. अखेर २६ नोव्हेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयाने मध्यस्थीची प्रक्रिया बंद केली.
सहा हजार कोटींची मागणी आणि हिस्स्यांवरून मतभेद
सुनावणीदरम्यान राणी कपूर यांच्या वकिलांनी ट्रस्टमधील दाव्यांचा निपटारा करण्यासाठी सहा हजार कोटी रुपयांची मागणी केल्याचे सांगितले. दुसरीकडे प्रिया कपूर यांच्या वकिलांनी ट्रस्टमधील संपत्तीचे मूल्य जवळपास ३० हजार कोटी रुपये असल्याचे न्यायालयाला सांगितले. यावर न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठाने सहा हजार कोटी रुपये देण्यासाठी संपत्ती विकण्याची अपेक्षा आहे का, असा सवाल उपस्थित केला. प्रिया कपूर यांच्या वकिलांनी ट्रस्टमधील ६० टक्के संपत्तीवर त्यांचा अधिकार असल्याचा दावा केला. उर्वरित ४० टक्के हिस्सा संजय कपूर यांच्या मुलांमध्ये विभागला जावा, अशी त्यांची भूमिका होती. तर अभिनेत्री करिश्मा कपूर यांची मुले समायरा आणि कियान यांच्या वकिलांनी ट्रस्टमध्ये २४ ते २६ टक्के हिस्स्याचा दावा केला.
ट्रस्टच्या वैधतेवर प्रश्न; दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी
या प्रकरणात राणी कपूर यांनी आरके फॅमिली ट्रस्टच्या वैधतेवरच प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचे पती आणि सोना समूहाचे संस्थापक सुरिंदर कपूर यांच्या निधनानंतर त्यांच्या संपत्तीतील मालमत्ता कोणतीही पूर्वसंमती न घेता ट्रस्टमध्ये हस्तांतरित करण्यात आल्याचा त्यांचा आरोप आहे. ट्रस्टची कागदपत्रे बनावट असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे हा ट्रस्ट रद्दबातल ठरवण्याची मागणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात केली आहे. मध्यस्थी बंद करताना सर्वोच्च न्यायालयाने समझोता कोणावरही लादता येत नाही, असे स्पष्ट केले. राणी कपूर यांनी ट्रस्टमधील संपत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाने ठराविक कालमर्यादेत निर्णय घ्यावा, असे संकेतही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, १२ जून २०२५ रोजी इंग्लंडमध्ये पोलो सामना खेळताना संजय कपूर यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर सुरू झालेला हा संपत्तीचा वाद आता पुन्हा न्यायालयीन लढाईच्या दिशेने गेला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा