मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे. तब्बल १८ वर्षे रखडलेला चिपळूण येथील बहादूरशेख नाका उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील या पुलाचे काम पूर्ण झाले असून ३० नोव्हेंबरपासून त्यावरून वाहतूक सुरू करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केले आहे.
पुलाच्या दोन्ही मार्गिकांवरून गुरुवारी, २६ नोव्हेंबर रोजी वाहतुकीची चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी, २७ नोव्हेंबरलाही चाचणी वाहतूक घेतली जाणार आहे. नव्याने आराखडा तयार करून बांधण्यात आलेला हा पूल सुरू झाल्यानंतर चिपळूण शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवासाचा वेळही वाचणार आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंच्या जोडरस्त्यांची कामेही पूर्ण झाली आहेत.
अंतिम टप्प्यातील काम युद्धपातळीवर
गेली कित्येक महिने रखडलेले या पुलाचे काम पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता अनामिका जाधव आणि मुख्य अभियंता वृषाली पाटील यांच्यासह संबंधित ठेकेदार कंपनीची यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. पुलाच्या अंतिम टप्प्यातील किरकोळ काम पुढील सात ते आठ दिवसांत पूर्ण केले जाणार आहे.
पॉवर हाऊस परिसरातील मागणी
हा उड्डाणपूल दोन वर्षांपूर्वी कोसळला होता. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. पॉवर हाऊस परिसरातील अपघात टाळण्यासाठी पुलाचा मार्ग पुढे थेट कापसाळापर्यंत वाढवावा, अशी स्थानिक नागरिकांची मोठी मागणी आहे. त्यानुसार प्रस्तावही तयार करण्यात आला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा