शिराळा तालुक्यातील कांदे-नाटोली रस्त्यावर चिखली गावाकडे जाणाऱ्या मार्गावर उभ्या असलेल्या ऊस ट्रॉलीला दुचाकीची धडक बसून झालेल्या अपघातात भागाईवाडी येथील रोहित शामराव शिंदे या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रोहित हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. या घटनेने भागाईवाडी गावात हळहळ व्यक्त होत आहे.
रुग्णालयातून पोलिसांना माहिती
या घटनेची माहिती उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. दीपक बनसोडे यांनी शिराळा पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या अपघाताचा पुढील तपास शिराळा पोलिस करत आहेत.
रस्त्यावरील ट्रॉलींवर नियंत्रणाची गरज
ऊस वाहतुकीच्या हंगामात रस्त्यांवर ठिकठिकाणी उभ्या केल्या जाणाऱ्या ऊस ट्रॉलींमुळे अपघाताचा धोका वाढत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी या ट्रॉली वाहनचालकांना सहज दिसून येत नसल्याने जीवघेणे अपघात घडत आहेत. रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या ट्रॉलींवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच त्यांना रिफ्लेक्टर आणि इतर सुरक्षा साधने लावण्याची गरज या घटनेमुळे अधोरेखित झाली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा