गेल्या आठवड्यात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला एक महत्त्वाचे निर्देश दिले. रक्ताच्या नात्यात होणाऱ्या विवाहांना आळा घालण्यासाठी कायदा करण्याचा विचार करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे. या निर्देशांमुळे आनुवंशिक विकारांचे विज्ञान आणि जवळच्या नात्यातील विवाहांमुळे निर्माण होणारे धोके पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. या धोक्याचे सर्वांत प्रसिद्ध उदाहरण म्हणजे अमेरिकेतील केंटकी राज्यातील डोंगराळ भागात स्थायिक झालेले फ्युगेट कुटुंब. या कुटुंबातील अनेक सदस्यांची त्वचा निळ्या रंगाची होती आणि त्यामागे जवळच्या नात्यातील विवाहांतून पुढे आलेला एक आनुवंशिक विकार कारणीभूत होता.
१८२० पासून सुरू झालेली कहाणी
१८२० मध्ये मार्टिन फ्युगेट नावाचा फ्रेंच स्थलांतरित अमेरिकेत आला. त्याने एलिझाबेथ स्मिथ या अमेरिकन महिलेशी विवाह केला. दोघांनाही माहीत नव्हते की दोघांच्याही शरीरात एका दुर्मीळ आनुवंशिक विकाराचा अप्रकट जनुक आहे. या दाम्पत्याला झालेल्या सात मुलांपैकी चार मुलांचा जन्म निळ्या त्वचेसह झाला. मुलांना इतर कोणताही स्पष्ट आरोग्यविषयक त्रास नव्हता आणि त्यांचे आयुष्य सामान्य होते, मात्र त्यांच्या त्वचेचा रंग निळाच राहिला. केंटकीतील ट्रबलसम क्रीक हा अत्यंत दुर्गम आणि ग्रामीण भाग होता. तेथे बाहेरच्या लोकांशी विवाह होणे कठीण होते. त्यामुळे मोजक्याच कुटुंबांमध्ये आपापसांत विवाह होऊ लागले आणि पुढच्या पिढ्यांमध्ये निळ्या त्वचेच्या सदस्यांची संख्या वाढत गेली. जगभरात या कुटुंबाची ओळख ‘केंटकीचे निळे लोक’ अशी झाली.
विकाराचे निदान आणि उपचार
१९६० मध्ये रक्तविकारतज्ज्ञ डॉ. मॅडिसन कॅवेन आणि परिचारिका रुथ पेंडरग्रास यांनी रॅचेल आणि पॅट्रिक रिची या निळ्या त्वचेच्या भावंडांचा अभ्यास केला. तेव्हा हा प्रकार जगासमोर आला. या कुटुंबाला मेथेमोग्लोबिनेमिया नावाचा दुर्मीळ आनुवंशिक रक्तविकार असल्याचे निदान झाले. या विकारामुळे शरीरात ऑक्सिजन वाहून नेण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. सर्वसामान्य व्यक्तीच्या रक्तात मेथेमोग्लोबिनचे प्रमाण एक टक्क्यापेक्षा कमी असते, तर या कुटुंबातील सदस्यांमध्ये हे प्रमाण दहा ते वीस टक्क्यांपर्यंत होते. मात्र, साध्या गोळ्यांच्या साहाय्याने या विकारावर नियंत्रण मिळवता येते, हे डॉ. कॅवेन यांनी शोधून काढले. त्यानंतर हळूहळू या कुटुंबातील निळ्या त्वचेचे प्रमाण कमी होत गेले. या कुटुंबातील शेवटचा निळ्या त्वचेचा सदस्य १९७५ मध्ये समोर आला होता. या कुटुंबाच्या कहाणीतून जवळच्या नात्यातील विवाहांमुळे आनुवंशिक दोष पुढच्या पिढ्यांमध्ये कसे पोहोचतात, हे स्पष्ट होते. म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा