गोव्यात सुरू असलेल्या ५७ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) प्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाबरा यांनी नवोदित कलाकारांना मोलाचे मार्गदर्शन केले. ‘द कास्टिंग मॅजिक : ऑडिशन्स अनप्लग्ड’ या विषयावर त्यांचा मास्टरक्लास पार पडला. अभिनय क्षेत्रात यश मिळवण्यासाठी वय महत्त्वाचे नसून प्रतिभा महत्त्वाची असते, असा सल्ला त्यांनी दिला. या मास्टरक्लासला नवोदित कलाकार, चित्रपट निर्माते, लेखक आणि माध्यम प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योग्य कलाकार शोधण्याची प्रक्रिया
३०० हून अधिक चित्रपट आणि वेब सीरिजसाठी कास्टिंग केलेल्या छाबरा यांनी कलाकार निवडीमागची प्रक्रिया सांगितली. देशात प्रचंड प्रतिभा असल्याचे त्यांनी नमूद केले. योग्य कलाकार शोधण्यासाठी त्यांची टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाते. देशातील विविध सांस्कृतिक कला आणि उपसंस्कृतींमध्ये अनेक प्रतिभावान कलाकार आहेत, असे त्यांनी सांगितले.
चित्रपटाची पटकथा तयार झाल्यानंतर दिग्दर्शक सर्वप्रथम कास्टिंगसाठी त्यांच्याशी चर्चा करतात. पात्राची पार्श्वभूमी, दिग्दर्शकाची कल्पना आणि भूमिकेला आवश्यक असलेले गुण समजून घेऊन कलाकाराची निवड केली जाते. दिग्दर्शक आपल्याकडे कलाकारांच्या माहितीसाठी नाही, तर मत आणि कल्पना जाणून घेण्यासाठी येतात. आपण कलाकार आणि दिग्दर्शक यांच्यातील दुवा असल्याचे छाबरा म्हणाले.
महोत्सव संचालकांकडून कौतुक
महोत्सवाचे संचालक आशुतोष गोवारीकर यांनी छाबरा यांच्या कामाचे कौतुक केले. मुकेश यांच्याकडे पात्र ओळखण्याची उत्तम नजर असून, भूमिकेला योग्य कलाकार शोधण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात, असे गोवारीकर म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा