सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी २६ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. बँकेच्या एकूण १९ जागांपैकी १० जागा याआधीच बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरित ९ जागांसाठी झालेल्या मतदानात ८६.९४ टक्के मतदान नोंदवले गेले. या निवडणुकीच्या निकालाकडे जिल्हाभराचे लक्ष लागले आहे.
तिरंगी लढतींकडे लक्ष
सोसायटी मतदारसंघात माळशिरस येथे मोहिते पाटील आणि बाबाराजे देशमुख यांच्यात लढत आहे. सांगोला मतदारसंघात आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यासमोर इंगोले यांचे आव्हान आहे. नागरी बँका मतदारसंघात शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांचे चिरंजीव मनीष देशमुख यांच्यात थेट लढत झाली आहे. अमोल शिंदे यांनी मोहिते पाटील यांच्या पॅनेलमधून उमेदवारी केली आहे.
मतदान केंद्रावर देशमुख-शिंदे भेट
सोलापूर शहर आणि उत्तर सोलापूर तालुक्यासाठी शहरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात मतदान केंद्र उभारण्यात आले होते. दोन्ही उमेदवार दिवसभर या केंद्रावर उपस्थित होते. मनीष देशमुख यांच्या निवडणुकीची पाहणी करण्यासाठी आमदार सुभाष देशमुख मतदान केंद्रावर आले असता अमोल शिंदे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी सुभाष देशमुख यांनी शिंदे यांच्या खांद्यावर हात ठेवत त्यांच्याशी बराच वेळ चर्चा केली. या भेटीमुळे जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा