पुण्याच्या पालकमंत्रीपदावरून सुरू असलेला वाद आता आणखी तीव्र झाला आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी पुण्याला कडक पालकमंत्री द्यावा, अशी मागणी केली होती. त्यावर मावळचे आमदार सुनील शेळके यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. रोहित पवार केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी राज्यातील आणि देशातील नेत्यांवर निराधार आरोप करत असल्याचा आरोप शेळके यांनी केला.
रोहित पवार यांनी अलीकडेच पुण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत आपले मत मांडले होते. अजित पवार यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही, मात्र पुण्याला कडक पालकमंत्री द्यावा किंवा सुनेत्रा पवार यांना अधिक ताकद द्यावी, असे ते म्हणाले होते. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याचे पालकमंत्रीपद घेतल्यास शहराचे नुकसान होईल, असेही त्यांनी म्हटले होते. या वक्तव्यांवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून शेळके यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवारांवर शेळकेंचा थेट हल्ला
शेळके म्हणाले की, रोहित पवार केवळ चर्चेत राहण्यासाठी बिनबुडाचे आरोप करत आहेत. स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींवरच ते अशा पद्धतीने बोलत असतील, तर त्यांना मानसिक रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. स्वतःची राजकीय प्रतिमा उंचावण्यासाठी आणि स्वतःला कर्तबगार दाखवण्यासाठी स्वतःच्याच कुटुंबावर शिंतोडे उडवणे त्यांनी थांबवावे, असे शेळके म्हणाले.
रोहित पवार यांनी आपल्या कर्जत-जामखेड मतदारसंघात जाऊन तेथील जनतेचे प्रश्न सोडवावेत, असा सल्लाही शेळके यांनी दिला. ते किती कर्तबगार आहेत, हे तिथली जनताच सांगेल, असेही ते म्हणाले.
सुनेत्रा पवार सक्षमपणे जबाबदारी सांभाळत आहेत
अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यावर अचानक मोठी जबाबदारी आली आहे, असे शेळके म्हणाले. त्या एक महिला असूनही कठीण परिस्थितीत ही जबाबदारी अत्यंत सक्षमपणे पार पाडत आहेत. त्या सकाळी सात वाजल्यापासून कामाला सुरुवात करतात. बारामती, पुणे जिल्हा, राज्य आणि पक्षाच्या जबाबदाऱ्यांसह सहकार व शैक्षणिक क्षेत्रातील संस्थाही त्या उत्तमरीत्या सांभाळत असल्याचा आम्हाला अभिमान आणि समाधान आहे, असे शेळके म्हणाले.
महायुती सरकारमध्ये कोणाला कोणते पद द्यायचे, हे आमचे नेते ठरवतील. रोहित पवार यांनी आमच्या पक्षात आणि महायुतीत हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असेही शेळके म्हणाले. त्यापेक्षा त्यांना स्वतःच्या पक्षात किती किंमत उरली आहे आणि त्यांना कोणी विचारते का, याचा विचार करावा, असे ते म्हणाले.
प्रतिक्रिया व्यक्त करा