, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

३५ वर्षे काम करणाऱ्या २६ कामगारांना अचानक कामावरून काढले

बुलढाण्यातील महाबीज प्रकल्पात ३५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या २६ कामगारांना कामावरून काढण्यात आले. कामगारांनी व्यवस्थापकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

३५ वर्षे काम करणाऱ्या २६ कामगारांना अचानक कामावरून काढले

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील महाबीज प्रकल्पात तब्बल ३५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या २६ महिला आणि पुरुष कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले आहे. या निर्णयाविरोधात कामगारांनी जिल्हा व्यवस्थापकांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काल सकाळपासून सुरू असलेले हे आंदोलन गेल्या ३६ तासांपासून सुरूच आहे. दुष्काळामुळे शेतकरी आधीच हवालदील झाला असताना कामगार वर्गावरही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळल्याने संताप व्यक्त होत आहे.

कामगारांचे आरोप काय आहेत

कामगार वेतन कायद्याच्या नियमाप्रमाणे मजुरी न देता कमी पैसे देऊन मस्टरवर सह्या घेतल्या जातात, तसेच भविष्य निर्वाह निधीचाही लाभ मिळत नसल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. जिल्हा व्यवस्थापकांकडून तुम्हाला कामावर घेणार नाही, कुठे जायचे ते जा अशा धमक्या दिल्या जात असल्याचा दावाही कामगारांनी केला आहे. कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे आणि त्यांना सन्मानाची वागणूक द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. या गंभीर प्रश्नावर महाबीजचे अधिकारी मात्र बोलण्यास तयार नसल्याने कामगारांचा संताप आणखी वाढला आहे.

उद्या बैठक, कामगारमंत्र्यांकडे लक्ष

कामगार आणि महाबीज अधिकाऱ्यांमध्ये उद्या बैठक होणार असून त्यात तोडगा निघण्याची आशा आहे. मात्र ठोस निर्णय होण्याची शक्यता धूसर असल्याने आता कामगारमंत्र्यांनीच यात लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याच बुलढाणा जिल्ह्यात कामगारांवर अन्याय होत असल्याचा आरोप आहे. आंदोलनकर्ते पुरुष अद्यापही कार्यालयातच असून रात्र असल्यामुळे महिलांना घरी पाठविण्यात आले आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance