मंत्रालयातील लिपिक आणि टंकलेखक गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत कामबंद आंदोलनावर आहेत. वेतनश्रेणीत बदल आणि पदनाम बदलण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या संकटाशी झुंजणाऱ्या राज्यात मंत्रालयाचा कारभार ठप्प पडला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) आमदार रोहित पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट लक्ष्य करत तीव्र टीका केली आहे.
शेतकरी आणि कर्मचारी दोघांनाही न्याय नाही
दुष्काळाने होरपळत असताना मंत्रालयातील कर्मचारी संपावर जाणे ही सरकारसाठी शरमेची बाब असून मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना असल्याचे रोहित पाटील यांनी म्हटले आहे. शेतकरी आणि कर्मचारी या दोघांनाही न्याय देण्यात मुख्यमंत्री आणि महायुती सरकार अपयशी ठरत असल्याचा आरोप त्यांनी केला. पोकळ आश्वासनांवर विसंबून न राहता सरकारने तातडीने ठोस निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी त्यांनी समाजमाध्यमांवरून केली.
सरकारची कठोर भूमिका, संप तीव्र होण्याची शक्यता
दरम्यान, संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांविरोधात राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला असून त्यासाठी शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे. काम नाही, तर वेतन नाही हे धोरण लागू करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्रालयातील कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकारने केवळ आश्वासने देऊन जनतेचा आणि कर्मचाऱ्यांचा विश्वासघात करू नये, तातडीने ठोस निर्णय घेऊन सर्वांना न्याय द्यावा, असे रोहित पाटील यांनी म्हटले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा