बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिच्या कुटुंबातील खास क्षणांचे फोटो नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. नुकताच ऐश्वर्याची वहिनी श्रीमा राय हिने सोशल मीडियावर तिच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे काही खास फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय, तिची मुलगी आराध्या बच्चन आणि आई वृंदा राय यांच्या नात्यातील खास बॉन्ड पाहायला मिळत आहे.
डिस्ने प्रिन्सेससारखा लूक चर्चेत
श्रीमा राय हिने बुधवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची एक मालिका शेअर केली. 21 नोव्हेंबर रोजी तिने आपला वाढदिवस साजरा केला होता. सुरुवातीच्या फोटोंमध्ये तिला मिळालेली फुले आणि भेटवस्तूंची झलक पाहायला मिळते. मात्र या पोस्टमधील शेवटच्या फोटोने नेटकऱ्यांचे सर्वाधिक लक्ष वेधून घेतले आहे. या फोटोमध्ये आराध्या बच्चन पांढऱ्या रंगाचा गाऊन आणि डोक्यावर प्रिन्सेस क्राऊन घालून अगदी डिस्ने प्रिन्सेससारखी दिसत आहे. आराध्याने आपल्या आजी वृंदा राय यांना प्रेमाने जवळ घेतले असून तिच्या बाजूला आई ऐश्वर्या राय उभी आहे. ऐश्वर्यानेही आपल्या भाच्याला जवळ घेत या फॅमिली फोटोसाठी पोज दिली आहे.
१५व्या वाढदिवसाची पार्टी?
हे फोटो शेअर करताना श्रीमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या कॅमेरा रोलमधील वाढदिवस… कृतज्ञता, फुले, सरप्राईज, काही गोड पदार्थ, आणखी फुले आणि मुले व सासूबाईंसोबत घालवलेली सुंदर संध्याकाळ. विशेष म्हणजे, श्रीमाच्या वाढदिवसाच्या पाच दिवस आधीच, म्हणजेच 16 नोव्हेंबर रोजी आराध्याने आपला 15 वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आराध्याचा हा फोटो तिच्या 15 व्या वाढदिवसाच्या पार्टीतला असावा असा अंदाज चाहत्यांनी लावला आहे.
श्रीमा राय ही ऐश्वर्या रायचा भाऊ आदित्य राय याची पत्नी असून त्यांना शिवांश आणि विहान अशी दोन मुले आहेत. श्रीमा एक प्रसिद्ध कंटेंट क्रिएटर आणि ब्युटी व्लॉगर आहे. तिने 2009 मध्ये मिसेस इंडिया स्पर्धेत दुसरे स्थान पटकावल्यानंतर मिसेस इंडिया ग्लोब हा किताबही जिंकला होता. दरम्यान, आराध्याच्या 15 व्या वाढदिवसानिमित्त आजोबा अमिताभ बच्चन यांनीही आपल्या ब्लॉगद्वारे तिला खास शुभेच्छा दिल्या होत्या. घरातील नातीचा वाढदिवस सोनेरी आणि भाग्यशाली जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
प्रतिक्रिया व्यक्त करा