मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेते मकरंद अनासपुरे आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतात. मात्र अभिनयासोबतच निसर्गाची आवड आणि घराच्या परिसरात झाडे लावण्याची आवडही अनेकांना प्रेरणा देणारी ठरते. त्यांनी घराच्या परसबागेत विविध झाडे आणि फळभाज्यांची लागवड करून छोटीशी बाग फुलवली आहे. घरच्या बागेत ताज्या आणि स्वच्छ भाज्या पिकवण्याचा आनंद काही वेगळाच असतो.
आजकाल अनेकजण घराच्या गच्चीवर, बाल्कनीत किंवा अंगणात भाजीपाल्याची लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. बाजारातून भाजी आणण्याऐवजी घरच्या घरी ताज्या भाज्या पिकवता येतात, हा त्यामागचा मोठा फायदा आहे. मात्र परसबागेत फळभाज्यांची लागवड करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. योग्य माती, पाणी, सूर्यप्रकाश आणि खत न मिळाल्यास वेलींची वाढ व्यवस्थित होत नाही. अनेकदा झाडाला भरपूर पाने येतात, पण फुले आणि फळे लागत नाहीत.
वेलवर्गीय भाज्यांसाठी योग्य जागा निवडा
घराच्या परसबागेत फळभाज्यांची लागवड करण्यापूर्वी योग्य जागेची निवड करणे महत्त्वाचे आहे. वेलवर्गीय भाज्यांना वाढण्यासाठी पुरेशी जागा आणि सूर्यप्रकाश आवश्यक असतो. त्यामुळे ज्या ठिकाणी दिवसातून किमान पाच ते सहा तास चांगला सूर्यप्रकाश मिळतो, अशी जागा निवडावी. घराच्या अंगणात, गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत या भाज्यांची लागवड करता येते. मात्र झाडांची वाढ झाल्यानंतर वेली एकमेकांत गुंतणार नाहीत, याची काळजी घ्यावी.
माती आणि सूर्यप्रकाशाची काळजी
वेलवर्गीय भाज्यांची चांगली वाढ होण्यासाठी माती भुसभुशीत आणि पाण्याचा निचरा होणारी असणे आवश्यक आहे. यासाठी बागेतील माती, कुजलेले शेणखत आणि कंपोस्ट खत यांचे योग्य मिश्रण तयार करता येते. मातीमध्ये सेंद्रिय खत मिसळल्यामुळे झाडांना आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते. माती खूप घट्ट किंवा चिकट असल्यास मुळांची वाढ व्यवस्थित होत नाही. दुधी भोपळा, कारले, दोडका, काकडी, घोसाळे यांसारख्या वेलवर्गीय भाज्या लावताना या सोप्या गोष्टी लक्षात ठेवल्यास घरच्या बागेत ताज्या भाज्यांचे चांगले उत्पादन मिळू शकते.
प्रतिक्रिया व्यक्त करा