, २७ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पालेभाज्या पहिल्यांदाच १० रुपयांना! घाऊक दर घसरले

संभाजीनगरमध्ये पालेभाज्या पहिल्यांदाच १० रुपये नगाने विकल्या गेल्या. घाऊक दर २०० ते ३०० रुपयांनी घसरले. पाणी कमी असल्याने शेतकऱ्यांचा कल पालेभाज्यांकडे वाढला.

पालेभाज्या पहिल्यांदाच १० रुपयांना! घाऊक दर घसरले

छत्रपती संभाजीनगरच्या बाजारात गुरुवारी पालेभाज्या पहिल्यांदाच १० रुपये नगाने विकल्या गेल्या. भर पावसाळ्यातही ज्या पालेभाज्यांचा दर १५ ते २० रुपयांखाली गेला नव्हता, त्या आता स्वस्त झाल्या आहेत. घाऊक बाजारात पालेभाज्यांच्या दरात मोठी घसरण झाल्याने किरकोळ विक्रीतही त्याचा परिणाम दिसून आला आहे.

घाऊक बाजारात दर कसे घसरले?

काही दिवसांपूर्वीपर्यंत ज्या मेथीची घाऊक बाजारात ८०० ते ११०० रुपये शेकड्याने विक्री झाली होती, त्याच मेथीची गुरुवारी ६०० ते ७०० रुपये शेकड्याने विक्री झाली. सुमारे ८०० ते १००० रुपये शेकड्याने विक्री झालेल्या पालकाची गुरुवारी ५०० रुपयांनी विक्री झाली. ९०० ते १००० रुपये शेकड्याने विक्री झालेल्या चुक्याची ६०० रुपयांनी, तर १००० रुपये शेकड्याने विक्री झालेल्या शेपूची ७०० रुपयांनी विक्री झाली. ८०० ते १००० रुपये शेकड्याने विक्री झालेल्या करडीची गुरुवारी ६०० रुपयांनी विक्री झाली.

कांदा पातही १००० रुपयांवरून ८०० रुपयांवर आली, तर कोथिंबीर ८०० रुपयांवरून ५०० ते ६०० रुपयांवर आली. त्यामुळे समस्त पालेभाज्यांच्या घाऊक दरांमध्ये शेकड्यामागे किमान २०० ते ३०० रुपयांनी घट झाल्याचे स्पष्ट झाले. त्याचाच परिणाम म्हणून गुरुवारी समस्त पालेभाज्यांची १० रुपये नगाने विक्री झाल्याचे पाहायला मिळाले.

हिरव्या वाटाण्याच्या दरातही घट होऊन किलोमागे ६२ रुपये या प्रमाणे घाऊक दराने गुरुवारी विक्री झाली. त्यामुळे १०० रुपयांमध्ये सव्वा किलो या प्रमाणे वाटाण्याची किरकोळ विक्री झाली. याच वाटाण्याची मोसमाच्या सुरुवातीच्या दिवसांत २५० ग्रॅममागे ७० रुपयांपर्यंत किरकोळ विक्री झाली होती. गाजरही तुलनेने स्वस्त झाले असून, राज्याअंतर्गत गाजराची आवक वाढली आहे. या आधी बाहेरच्या राज्यातील गाजरांची आवक होत होती. त्यामुळेच भाव ८० रुपये किलोवरून ५५ ते ६० रुपयांवर आला आहे.

रब्बीसाठी पाणी कमी, त्यामुळे भाजीपाला स्वस्त राहणार?

मात्र सर्वच भाज्या स्वस्त झालेल्या नाहीत. भेंडी महागली असून, ६० ते ६२ रुपयांवरून ८० रुपये किलोपर्यंत तिचा दर वाढला आहे. भूईमूगाच्या शेंगाही ९५ ते १०० रुपयांवरून १२० रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. इतर भाज्यांच्या दरांमध्ये चढ-उतार नसल्याचे भाजी विक्रेते भारत खणसे यांनी सांगितले.

रब्बीच्या पिकाला तीन ते साडेतीन महिन्यांपर्यंत पुरेल, इतके पाणी अनेक भागांत नाही. त्यामुळे कमी पाण्यात आणि अवघ्या एक-दीड महिन्यांत येणारा भाजीपाला लावण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. त्याचा परिणाम म्हणून डिसेंबरअखेरपर्यंत भाजीपाला काहीसा स्वस्त राहू शकतो, अशी प्रतिक्रिया शेतकरी व विक्रेते सोमनाथ शिंदे यांनी दिली आहे.

अभी जाधव

Similar Posts

View All

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance