बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. खंडणीसाठी गोळीबार, मारहाण, धारदार शस्त्रांनी हल्ले आणि तरुणाईचा गुन्हेगारीकडे वाढता कल यांमुळे शहराच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली.
बारामती शहराची शांत, सुरक्षित आणि विकसित शहर अशी ओळख आहे. मात्र अलीकडच्या घटनांमुळे या प्रतिमेला धक्का बसत असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेषतः उद्योजकांना धमकावून खंडणी मागणं आणि त्यासाठी थेट गोळीबार करण्यापर्यंत गुन्हेगारांची मजल जाणं ही गंभीर बाब मानली जात आहे.
गोळीबाराच्या घटनेने चिंता वाढली
२१ नोव्हेंबर रोजी बारामतीतील बांधकाम व्यावसायिक राजन कोळेकर यांच्या वाहनावर खंडणीच्या मागणीतून गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत दोन पिस्तुले जप्त केली आहेत. या घटनेने शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक चर्चेत आला आहे.
कठोर कारवाईची मागणी
याच पार्श्वभूमीवर युगेंद्र पवार यांनी चैतन्य कदम यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. शहरातील वाढत्या गुन्हेगारीला प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी अधिक सतर्क राहणं, गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करणं आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणं आवश्यक असल्याचं या चर्चेत अधोरेखित करण्यात आलं.
या भेटीनंतर युगेंद्र पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत बारामतीतील परिस्थितीबाबत आपली भूमिका मांडली. “बारामतीमध्ये वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय बनला आहे. कोयता गॅंग बारामतीमध्ये सक्रिय झाली आहे. मुलींची छेडछाड वाढली आहे. चक्क पोलिसांवरच गाडी घालण्याचा प्रकार आज घडला, पोलीसच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्यांचे काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शहरातील शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने प्रभावी पावले उचलण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
प्रतिक्रिया व्यक्त करा