गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. अवघ्या एका महिन्यात सोन्याचे दर सुमारे २२ हजार रुपयांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेषतः लग्नसराईच्या हंगामात सोने खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी ठरत आहे. दागिने घ्यायचे असतील किंवा सोन्यात दीर्घकाळासाठी गुंतवणूक करायची असेल, तर सध्याची घसरण ही चांगली संधी मानली जात आहे.
दर घसरण्यामागची कारणे
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर मोठा परिणाम होतो. अमेरिकेतील महागाई, फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरांबाबतची अनिश्चितता, डॉलरची मजबुती आणि अमेरिकेतील सरकारी रोख्यांवरील वाढते उत्पन्न यामुळे सोन्याच्या किमतीवर दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय यापूर्वी दर मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक गुंतवणूकदारांनी नफा कमावण्यासाठी सोने विकले, त्यामुळेही किमतीत घसरण झाली. भारतीय रुपयाची तुलनेने झालेली मजबुती हेही देशांतर्गत दर कमी होण्यामागचे एक कारण आहे.
आता सोने खरेदी करावे का?
तज्ज्ञांच्या मते एमसीएक्सवर सोन्यासाठी एक लाख १७ हजार ९०० रुपये प्रति १० ग्रॅम हा महत्त्वाचा आधार स्तर आहे. सध्याच्या परिस्थितीत सोन्याचा दर एक लाख रुपयांच्या खाली जाण्याची शक्यता कमी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यामुळे लग्नासाठी किंवा वैयक्तिक गरजांसाठी सोने खरेदी करणाऱ्यांना सध्याची घसरण संधी ठरू शकते. मात्र एकाच वेळी संपूर्ण सोने खरेदी करण्याऐवजी दोन ते तीन टप्प्यांत खरेदी करणे अधिक योग्य ठरेल, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दर आणखी कमी होतील या अपेक्षेने खरेदी पूर्णपणे पुढे ढकलणे योग्य ठरणार नाही. काही तज्ज्ञांच्या मते २०२७ मध्ये सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यताही आहे. त्यामुळे घाई न करता आणि संपूर्ण रक्कम एकाच वेळी न गुंतवता विचारपूर्वक निर्णय घ्यावा.
प्रतिक्रिया व्यक्त करा