संध्याकाळच्या चहासोबत खायला कुरकुरीत आणि चटपटीत काहीतरी हवे असेल, तर गव्हाच्या पिठापासून तयार होणारी मसाला पापडी हा उत्तम पर्याय आहे. बाजारातली पापडी विसरून ही चविष्ट पापडी घरीच सहज बनवता येते. एकदा बनवली की संध्याकाळचा चहा आणखी रंगतदार होतो.
साहित्य
दोन वाट्या गव्हाचे पीठ, दोन चमचे तेल किंवा तूप, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरे, लाल तिखट, हळद, चवीनुसार मीठ, थोडी कसुरी मेथी, गरजेनुसार पाणी आणि तळण्यासाठी तेल.
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम एका मोठ्या परातीत गव्हाचे पीठ घ्या. त्यात ओवा, जिरे, लाल तिखट, हळद, मीठ आणि कसुरी मेथी घाला. त्यानंतर तेल किंवा तूप टाकून सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करा. आता थोडे थोडे पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्या. पापडी कुरकुरीत होण्यासाठी पीठ फार मऊ करू नका. मळलेले पीठ काही वेळ झाकून बाजूला ठेवा.
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे तयार करा. प्रत्येक गोळा पोळीप्रमाणे पातळ लाटून घ्या. त्यानंतर सुरीने किंवा कटरने छोटे गोल अथवा चौकोनी तुकडे कापून घ्या. कापलेल्या पापडीला काट्याने हलके टोचे द्या. यामुळे तळताना पापडी फुगण्याची शक्यता कमी होते. सर्व पापड्या तयार करून एका ताटात ठेवा.
कढईत तेल गरम करा. तेल मध्यम गरम झाल्यावर पापड्या त्यात सोडा. मंद ते मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. त्यानंतर टिश्यू पेपरवर काढून अतिरिक्त तेल निथळू द्या. गरमागरम चहासोबत कुरकुरीत मसाला पापडी सर्व्ह करा. एकदा बनवल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्या आणि हवाबंद डब्यात साठवा. संध्याकाळच्या चहासाठी किंवा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी हा उत्तम खमंग नाश्ता ठरेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा