राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांना पुन्हा एकदा मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्यांना त्रास जाणवू लागला होता, त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांकडून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शरद पवार यांच्या प्रकृतीबाबतची ही बातमी समोर येताच राजकीय वर्तुळातही चिंता व्यक्त होत आहे.
सुप्रिया सुळे यांनी दिली प्रकृतीची माहिती
खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांना प्रवास कमी करण्याचा आणि विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र ते तो सल्ला ऐकत नाहीत, त्यांना कामात रमून जायला आवडते, असेही त्यांनी नमूद केले. सध्या त्यांची तब्येत ठीक असून सर्वांनी व्यक्त केलेल्या काळजीबद्दल आणि दिलेल्या शुभेच्छांबद्दल त्यांनी मनापासून आभार मानले आहेत. सुप्रिया सुळे स्वतःही शरद पवार यांच्या भेटीसाठी रुग्णालयात पोहोचल्या आहेत. त्यांच्यासोबत सदानंद सुळे आणि रेवती सुळे हे देखील रुग्णालयात दाखल झाले आहेत.
प्रफुल्ल पटेल यांची भेट; विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा उधाण
दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनीही रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे. योगायोगाने आपल्या मुलीच्या सासूंचे उपचार याच रुग्णालयात सुरू आहेत, त्यामुळे आपण इथे आलो असल्याचे पटेल यांनी सांगितले. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, त्यांची प्रकृती उत्तम आहे आणि काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. भेटीच्या वेळी ते जेवण करत होते, त्यामुळे आपण फार वेळ थांबलो नाही, असेही पटेल म्हणाले. काही दिवसांपूर्वी शरद पवार रुग्णालयात असताना देखील प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाची चर्चा पुन्हा सुरू झाली होती. आता पुन्हा एकदा झालेल्या या भेटीमुळे त्या चर्चेला नव्याने उधाण येण्याची शक्यता आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा