२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानचा अतिरेकी अजमल कसाब आणि त्याच्या दहा साथीदारांनी मुंबईवर हल्ला केला होता. त्या हल्ल्याला आज १८ वर्षं पूर्ण होत आहेत. या हल्ल्यात निष्पाप नागरिकांसह पोलीस आणि सैन्य दलातील अधिकारीही शहीद झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ताज हॉटेल आणि कुलाब्यातील ज्यू प्रार्थनास्थळ छाबड हाऊस ही ठिकाणं अतिरेक्यांच्या निशाण्यावर होती. नरिमन हाऊसमधील छाबड हाऊसचे धार्मिक नेते रब्बी गॅव्ह्रिएल होल्ट्झबर्ग आणि त्यांच्या पत्नीची अतिरेक्यांनी हत्या केली. त्यांचा अवघ्या दोन वर्षांचा मुलगा मोशे मात्र त्याच्या आयाने लपवून ठेवल्यामुळे वाचला. तो पुढे जगभरात बेबी मोशे म्हणून ओळखला गेला.
वडिलांप्रमाणे रब्बी बनण्याचं स्वप्न
बेबी मोशे उर्फ मोशे होल्ट्झबर्ग आज २० वर्षांचा झाला आहे. त्याला आता त्याच्या दिवंगत वडिलांप्रमाणेच ज्यूंचा धार्मिक गुरु म्हणजे रब्बी बनायचं आहे. सध्या तो न्यूयॉर्कमध्ये रब्बी होण्यासाठी धार्मिक शिक्षण घेत आहे. ज्यू धर्मात आध्यात्मिक मार्गदर्शक गुरुला रब्बी म्हणतात. तो धार्मिक शिक्षक आणि धार्मिक कायद्यांचा अभ्यासक मानला जातो. नरिमन हाऊसची जबाबदारी सध्या पाहणारे रब्बी इस्रायल कोझलोव्स्की यांनी सांगितलं की, दोनच आठवड्यांपूर्वी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या रब्बींच्या एका परिषदेत त्यांची मोशेशी भेट झाली.
चार ते पाच हजार रब्बींच्या परिषदेत भेट
न्यूयॉर्कमध्ये झालेल्या त्या परिषदेला जगभरातून चार ते पाच हजार रब्बी उपस्थित होते. त्यामध्ये छाबड हाऊसचा बेबी मोशेही सहभागी झाला होता, असं कोझलोव्स्की यांनी सांगितलं. त्यांनी त्यावेळी आपल्या मोबाईलमध्ये बेबी मोशेचं एक छायाचित्रही घेतलं. त्या छायाचित्रात पारंपरिक ज्यू धार्मिक वेशभूषेत मोशे इतर रब्बींसोबत प्रार्थनेला आलेला दिसत आहे. कोझलोव्स्की हे २०१२ पासून नरिमन हाऊसमधील कामकाज पाहत आहेत. गॅव्ह्रिएल होल्ट्झबर्ग यांच्यानंतर चानोच गेक्टमन यांनी नरिमन हाऊसची जबाबदारी सांभाळली होती आणि त्यांच्यानंतर कोझलोव्स्की यांनी ही जबाबदारी स्वीकारली.
प्रतिक्रिया व्यक्त करा