मुंबईतील माहिम भागातील प्रसिद्ध पीसी जैन ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे. दुकानाचे मालक भरत जैन यांना १० कोटी रुपयांच्या खंडणीसाठी यापूर्वी तीन वेळा धमकीचे संदेश आले होते आणि त्याबाबत त्यांनी पोलिसांत तक्रारही नोंदवली होती. त्यानंतर दुकानावर गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
तीन वेळा धमकीचे संदेश
भरत जैन यांना पहिला धमकीचा संदेश १८ ऑक्टोबर रोजी अनोळखी क्रमांकावरून आला होता. सुरुवातीला त्यांनी तो संदेश स्पॅम समजून दुर्लक्ष केले, मात्र त्याच दिवशी संध्याकाळी त्यांना जीवे मारण्याची धमकी देणारा संदेश आल्याने ते हादरले. त्यानंतर २४ ऑक्टोबर रोजी पुन्हा धमकीचा संदेश आला. शेवटची धमकी ३१ ऑक्टोबर रोजी आली. त्या संदेशात पैसे तयार ठेवण्याची आणि न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी देण्यात आली होती, अशी माहिती तक्रारीतून समोर आली आहे.
दुकानावर २ ते ३ गोळ्या; सीसीटीव्हीत हल्लेखोर कैद
२५ नोव्हेंबर रोजी रात्री साडेसातच्या सुमारास दोन तरुण काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून दुकानाबाहेरील फुटपाथवर आले आणि त्यांनी २ ते ३ गोळ्या झाडल्या. गोळीबारात दुकानाच्या काचेच्या दरवाजाचे नुकसान झाले. त्यावेळी भरत जैन दुकानातच बसले होते, तर कर्मचारी नामदेव गुरु आणि सुधाकर हेदेखील दुकानात होते. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील दुकानदार आणि नागरिक घटनास्थळी जमा झाले. सीसीटीव्ही चित्रणात हल्लेखोर आणि त्यांची दुचाकी कैद झाली असून दुचाकीचा क्रमांक एमएच १५ एजे ३५६५ असल्याचे दिसून आले आहे. दुचाकी चालवणारा तरुण अंदाजे २० ते २५ वर्षांचा, सुमारे ५ फूट ६ इंच उंचीचा, मध्यम बांध्याचा, काळी जॅकेट-पँट, चेहऱ्यावर काळा मास्क आणि डोक्यावर टोपी घातलेला होता. मागे बसलेला तरुणही २० ते २५ वर्षांचा, सुमारे ५ फूट ८ इंच उंचीचा, सडपातळ बांध्याचा, काळी जॅकेट, निळी जीन्स आणि हेल्मेट घातलेला होता. दोन्ही हल्लेखोरांना पुन्हा पाहिल्यास ओळखू शकेन, असे भरत जैन यांनी पोलिसांना सांगितले आहे. हल्लेखोरांनी खंडणी वसूल करण्यासाठी कट रचून जीवघेणा हल्ला केल्याचा त्यांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा