क्रिकेटमध्ये आतापर्यंत पुरुष आणि महिलांचे सामने स्वतंत्रपणे खेळवले जातात. मात्र आता ही पद्धत बदलण्याच्या दिशेने एक नवा प्रयोग होणार आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू आणि 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य झहीर खान यांच्या कंपनीने पुरुष आणि महिला खेळाडूंची एकत्रित टी-20 लीग सुरू करण्याची घोषणा केली आहे.
‘EQUAL’ लीग कशी असेल?
या लीगचे नाव ‘EQUAL’ असे असून, या स्पर्धेत पुरुष आणि महिला क्रिकेटपटू एकाच संघाकडून खेळताना दिसणार आहेत. या लीगचे पहिले पर्व ऑगस्ट 2027 मध्ये जर्मनीत होणार आहे.
झहीर खान यांची सहमालकी असलेली स्टॉकहोममधील अँकर स्पोर्ट्स एबी (Anchor Sports AB) या कंपनीने जर्मन क्रिकेट फेडरेशनसोबत (Deutscher Cricket Bund) भागीदारी केली आहे. या दोघांच्या सहकार्याने ही टी-20 लीग सुरू केली जाणार असून, क्रिकेटमध्ये अशा प्रकारची लीग सुरू करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.
पहिल्या पर्वात एकूण पाच संघ सहभागी होणार असून, या स्पर्धेत 12 टी-20 सामने खेळवले जातील. प्रत्येक संघात 18 खेळाडू असतील, तर मैदानात उतरणाऱ्या 11 खेळाडूंमध्ये 6 महिला आणि 5 पुरुष खेळाडूंचा समावेश असेल.
विशेष नियम आणि सुरक्षितता
या स्पर्धेत टी-20 क्रिकेटचे नेहमीचे नियम कायम असणार आहेत. मात्र पुरुष आणि महिला खेळाडू एकाच संघात खेळणार असल्याने काही विशेष नियमही तयार केले जाणार आहेत. यामध्ये खेळाडूंची सुरक्षितता, बदली खेळाडूंचे नियम आणि सामन्यादरम्यान होणारे बदल यांचा समावेश असेल, जेणेकरून सामने योग्य पद्धतीने आणि सुरक्षित वातावरणात खेळवता येतील.
प्रतिक्रिया व्यक्त करा