केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने पीएफ रक्कम काढण्यासाठी एसडब्ल्यूपीला मंजूरी दिली आहे. म्हणजे सदस्यांना पीएफ रक्कम टप्प्याटप्प्याने काढता येणार आहे. आता सिस्टेमॅटिक विड्रॉल प्लॅन (एसडब्ल्यूपी) द्वारे काढण्यात येणारी रक्कम करमुक्त करण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालयाने आयकर अधिनियम, २०२५ मध्ये दुरुस्ती करण्याची मागणी वित्त मंत्रालयाकडे केल्याची माहिती समोर येत आहे.
## एसडब्ल्यूपी सुविधा कशी काम करेल
१९ नोव्हेंबर २०२६ रोजी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या २४० व्या बैठकीत निवृत्तीनंतरच्या सदस्यांसाठी एसडब्ल्यूपी पर्यायाला हिरवा कंदील दाखवण्यात आला होता. या सुविधेनुसार, सदस्य उर्वरित निधीवर व्याज मिळवत असतानाच मासिक, त्रैमासिक अथवा सहामाही तत्त्वावर ठराविक रक्कम काढू शकतात. साधारणपणे ईपीएफ खाते पाच वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असल्यास एकरक्कमी पैसे काढल्यावर त्यावर कर लागत नाही. त्याच धरतीवर एसडब्ल्यूपी अंतर्गत काढण्यात येणारी रक्कमही करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. श्रम मंत्रालयाने ईपीएफ अंशदानावरील व्याजावर कर सवलतीचा प्रस्ताव ठेवला आहे. यासाठी वित्त मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला आहे आणि प्राथमिक चर्चा झाली आहे. आयकर अधिनियम २०२५ मध्ये आवश्यक सुधारणा करण्याविषयी आता हा मुद्दा पुढे रेटण्यात येणार आहे. तसेच सेवानिवृत्तीनंतरही ईपीएफमध्ये योगदान देण्याची परवानगी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे व्याजावरील करनियम स्पष्ट करण्याची मागणी करण्यात येत आहे.
## करमुक्तीच्या निर्णयाकडे ८ कोटींचे लक्ष
एसडब्ल्यूपी सुविधेमुळे निवृत्तीनंतर सदस्यांना नियमित आणि खात्रीशीर उत्पन्न मिळेल, तर खात्यातील शिल्लक रक्कमेवर व्याज मिळत राहील. त्यातच जर रक्कम काढताना ती करमुक्त झाली, तर कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल. वित्त मंत्रालय श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या प्रस्तावावर काय निर्णय घेते आणि ही रक्कम करमुक्त होते का, याकडे देशातील ८ कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. ही कर सवलत मिळाल्यास उतारवयात कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होईल.
प्रतिक्रिया व्यक्त करा