लहान मुलांसाठी घरीच चटपटीत आणि चमचमीत पनीर रोल फ्रँकी बनवता येते. बाहेरचे खाद्यपदार्थ टाळून घरच्या घरी पौष्टिक आणि चविष्ट फ्रँकी तयार करण्याची ही सोपी रेसिपी आहे. मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.
फ्रँकीसाठी पीठ मळून घ्या
एका भांड्यात गव्हाचे पीठ, मैदा, चवीनुसार मीठ आणि थोडे तेल घ्या. त्यात पाणी घालून मऊसर पीठ मळून घ्या. काही वेळ पीठ झाकून ठेवा, जेणेकरून ते चांगले मुरेल आणि पोळ्या मऊ होतील.
पनीरला मसाला लावा आणि सारण तयार करा
पनीरचे लांबट तुकडे करून घ्या. एका भांड्यात दही, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे पावडर, मीठ आणि आले-लसूण पेस्ट एकत्र करा. तयार मसाल्यामध्ये पनीरचे तुकडे घालून व्यवस्थित एकत्र करा. पनीरला मसाला चांगला लागण्यासाठी १० ते १५ मिनिटे बाजूला ठेवा.
कढईत थोडे तेल किंवा बटर गरम करा. त्यात कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो घालून परतून घ्या. आता त्यात मसाला लावलेले पनीर घालून चांगले शिजवून घ्या. पनीरचे चविष्ट सारण तयार झाले की, ते बाजूला ठेवा.
पोळी तयार करून फ्रँकी गुंडाळा
मळलेल्या पिठाचे छोटे गोळे करून घ्या आणि त्याच्या पातळ पोळ्या लाटा. तव्यावर थोडे तेल किंवा तूप घालून दोन्ही बाजूंनी पोळी छान भाजून घ्या. तयार पोळीवर हिरवी चटणी किंवा टोमॅटो सॉस लावा. त्यावर पनीरचे सारण, बारीक चिरलेला कांदा आणि कोबी घाला. वरून थोडा चाट मसाला भुरभुरवा.
पोळीच्या दोन्ही बाजू दुमडून त्याचा रोल तयार करा. तव्यावर थोडे बटर लावून फ्रँकी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. गरमागरम पनीर रोल फ्रँकी सॉससोबत सर्व्ह करा. मुलांना ही चटपटीत फ्रँकी नक्कीच आवडेल.
प्रतिक्रिया व्यक्त करा