पुणे शहरासह संपूर्ण महानगराची वाढती पाण्याची तहान भागवण्याच्या दृष्टीने स्वतंत्र धरण बांधण्याची चाचपणी लवकरच केली जाण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीनंतर नव्या धरणासाठी तीन संभाव्य जागांचा शोध घेण्यात येणार आहे. या धरणातून पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना किती पाणी मिळेल, याबाबत आगामी काळात धोरणात्मक निर्णय घेतला जाण्याची चिन्हे आहेत.
सध्या पुणे शहराला खडकवासला धरण साखळीतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या पाहता पुण्याची पाण्याची गरज आणखी वाढणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्याशिवाय पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर क्षेत्राला अतिरिक्त पाणीपुरवठ्याची गरज पडणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवे धरण बांधण्याच्या दृष्टीने प्राथमिक सर्वेक्षण आणि संभाव्य जागांचा शोध घेण्याच्या स्पष्ट सूचना फडणवीस यांनी दिल्या होत्या.
खडकवासला धरण साखळीवरील ताण
खडकवासला धरणातून बारामती, इंदापूर आणि दौंड या ग्रामीण भागातील शेतीसाठीही पाणी दिले जाते. त्यामुळे पाऊस कमी झाल्यास किंवा धरण साखळीत पाणी कमी असल्यास प्राधान्य शहरातील नागरिकांना द्यायचे की शेतीला, यावरून कायम वाद होत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर नव्या धरणासाठी संभाव्य जागा कोणत्या असतील, याबाबत सविस्तर सादरीकरण झाले असून, जलसंपदा विभागाशी चर्चा करून त्याबाबतची पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे स्पष्ट संकेत महापालिकेने दिले आहेत.
हे नवे धरण पुणे महानगरातील पाण्यासाठी असल्याने धरणाच्या बांधकामाचा खर्च स्थानिक स्वराज्य संस्थांनी करणे अपेक्षित आहे. या धरणात जमा होणाऱ्या पाण्यातून दोन्ही महापालिका आणि पीएमआरडीए यांना पाण्याचा किती कोटा निश्चित केला जाईल, याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. या धरणाच्या बांधकामासाठी राज्य सरकार काही मदत करणार का, याबाबतही विचारविनिमय केला जाण्याची शक्यता आहे. धरणासाठीच्या जागा नेमक्या कोणत्या असतील आणि कोणत्या भागात हे धरण बांधण्यात येईल, याबाबत सध्या तरी महापालिका किंवा जलसंपदा विभागाचे अधिकारी काहीही सांगण्यास तयार नाहीत.
प्रस्ताव प्राथमिक स्तरावर; पुढे काय
सध्या हा प्रस्ताव अत्यंत प्राथमिक स्तरावर आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुढील सूचना प्राप्त होताच जिल्ह्यातील संभाव्य जागा अंतिम करण्यासह नव्या धरणासाठीचा आराखडा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, अशी माहिती जलसंपदा आणि महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान, धरण साखळीतील एकूण पाणीसाठ्याची स्थिती लक्षात घेता शहरात १० टक्क्यांऐवजी २० टक्के पाणीकपात करण्याची सूचना करण्यात आली आहे. महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक पुढील आठवड्यात घेण्यात येणार असून, त्यानंतर वाढीव पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, असे संकेत महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा