सोशल मीडियावर सध्या ५०० आणि २०० रुपयांच्या नोटांबाबत एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये १ जानेवारी २०२७ पासून या दोन्ही नोटा चलनातून बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, या दाव्यात तथ्य आहे का, याची पडताळणी केली असता हा दावा खोटा असल्याचे समोर आले आहे.
व्हायरल मेसेजमध्ये भारतीय रिझर्व्ह बँक, म्हणजेच आरबीआय, ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद करणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, आरबीआयने असा कोणताही अधिकृत निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी या मेसेजवर विश्वास ठेवू नये. या नोटा बंद करण्याबाबत आरबीआयकडून कोणतीही सूचना किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही.
२००० च्या नोटांच्या निर्णयाशी संबंध नाही
याआधी आरबीआयने २,००० रुपयांच्या नोटांबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला होता. मे २०२३ मध्ये आरबीआयने २,००० रुपयांच्या नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. या निर्णयामुळे अनेकांच्या मनात पुन्हा एकदा नोटबंदीबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याची अफवा पसरवली जात आहे. मात्र, २,००० रुपयांच्या नोटांबाबत घेतलेला निर्णय आणि सध्या चलनात असलेल्या ५०० व २०० रुपयांच्या नोटा यांचा एकमेकांशी कोणताही संबंध नाही.
फॅक्ट चेकमध्ये काय आढळले?
१ जानेवारी २०२७ पासून ५०० आणि २०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचा दावा चुकीचा आहे. आरबीआयने यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी अशा दिशाभूल करणाऱ्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. पैशांशी संबंधित कोणतीही बातमी खरी आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवरील माहिती तपासावी. सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा मेसेजची शहानिशा केल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नये आणि ते पुढे पाठवू नयेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा