संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनाची तयारी केंद्र सरकारने सुरू केली आहे. केंद्रीय मंत्र्यांना १५ डिसेंबरच्या आधी अधिवेशनाची तयारी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याआधी कोणीही परदेशात जाऊ नये, अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्या आहेत. या अधिवेशनात मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणि महिला आरक्षण विधेयक मांडले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हिवाळी अधिवेशनावर चर्चा झाली. अधिवेशनाची तारीख आणि कालावधी संसदीय कामकाज विषयक मंत्रिमंडळ समिती निश्चित करणार आहे. सध्या अधिवेशन बोलावण्यास विलंब होत असल्यावरून विरोधकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. १३ ऑगस्ट रोजी संसदेची दोन्ही सभागृहे अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली होती आणि त्यानंतर आता १०० दिवसांचा कालावधी उलटला आहे. मात्र, हिवाळी अधिवेशनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यात विशेष अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ पुनर्रचनेसाठी हे अधिवेशन बोलावले जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
विधेयक मंजुरीसाठी दोन-तृतीयांश बहुमताची गरज
मांडले जाणारे विधेयक योग्य बहुमत मिळाल्याशिवाय अधिवेशनात मंजूर होऊ शकत नाही. लोकसभेत विधेयक मंजूर करण्यासाठी दोन-तृतीयांश म्हणजे ३६१ खासदारांच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे. सभागृहात ५४३ सदस्यांपैकी ३ जागा रिक्त आहेत, त्यामुळे सध्या सभागृहात ५४० सदस्य आहेत. सत्ताधारी आघाडीकडे सध्या ३२० खासदार आहेत, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षांच्या पाठिंब्याचीही गरज लागणार आहे. विरोधी पक्षातील २६ खासदारांच्या भूमिकेमुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यामुळे अधिवेशनात डीएमके आणि शरद पवार गटाची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
दक्षिणेकडील राज्यांची चिंता दूर करण्याचा प्रयत्न
मतदारसंघ पुनर्रचनेवरून दक्षिण भारतीय राज्यांनी चिंता व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांची चिंता दूर करण्यासाठी केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांमधील लोकसभा मतदारसंघांची संख्या ५० टक्क्यांनी वाढवण्याचा विचार करत आहे. या प्रस्तावामुळे १९७१ च्या जनगणनेवर आधारित राज्यांमधील लोकसभा मतदारसंघांचे सध्याचे प्रमाण कायम राहील. मात्र, या विषयावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
प्रतिक्रिया व्यक्त करा