ठाणे : चार वर्षांपूर्वी कोपरी परिसरातील कुंभारवाडा येथे शिवसेना शाखेवरून दोन्ही शिवसेनेमध्ये वाद निर्माण झाला होता. पुन्हा या शाखेवरून नाराजी नाट्य पाहायला मिळत आहे. चेंदणी कोळीवाड्यातील खासदार क्रीडा चषक कार्यक्रमानंतर शाखेत गेलेले शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना भिंतीवर एकनाथ शिंदे यांच्या शेजारी उद्धव ठाकरे यांचा फोटो पाहताच त्यांनी नाराजी व्यक्त केली. फोटो पाहून श्रीकांत शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना जाब विचारला, काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, त्यानंतर श्रीकांत शिंदे रागाने शाखेतून बाहेर पडल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.
शाखेवरून साडेतीन वर्षांपासून वाद सुरू
यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नगरसेवक यांनाही या नाराजीचा सामना करावा लागला. गेल्या साडेतीन वर्षांपासून शाखेवरून दोन्ही गटात वाद सुरू आहे. शिंदे गटाला सहअस्तित्वाची तडजोड करावी लागत असल्याची चर्चा आहे. प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे आधीच कोंडीत असलेल्या पक्षाच्या अडचणीत कोपरी वादामुळे भर पडली आहे.
सध्या या शाखेमध्ये शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी बसतात आणि आपापला कारभार करतात. शाखेमध्ये दोन्ही पक्षाच्या नोंदणी वह्या ठेवण्यात आल्या असून, एकच कपाट देखील आहे. त्यावर दोन्ही पक्षांचे स्टिकर लावण्यात आलेले आहेत.
शाखेचा ताबा हाच मूळ प्रश्न
शाखेतील फोटोवरून निर्माण झालेल्या या नाराजीमुळे ठाण्यातील शिवसेनेतील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे. दोन्ही गट एकाच शाखेतून काम करत असताना अशा घटना वारंवार घडत असल्याने शाखेच्या ताब्याबाबतचा वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शाखेच्या ताब्याबाबतचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही, त्यामुळे कोपरी शाखेवरून दोन्ही गटांमधील तणाव कायम राहण्याची चिन्हे आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा