रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या कंटेनरला दुचाकीची जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी, २४ तारखेला रात्री अकराच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज फाट्याजवळील पेट्रोल पंपाजवळ घडली.
अपघात कसा घडला?
मृत तरुणाचे नाव प्रसाद काशिलिंग कोळेकर (वय २२, रा. आरेवाडी, ता. कवठेमहांकाळ) असे आहे. तो दुचाकीवरून (क्र. एमएच ४५ आर ७४७२) आरेवाडीहून कालव्यावरून नागजच्या दिशेने येत होता. त्यावेळी मिरजेच्या दिशेने जाण्यासाठी उभा असलेला कंटेनर (क्र. डीडी ०३ आर ९६५९) पेट्रोल पंपाजवळ थांबला होता. दुचाकीची कंटेनरला जोरदार धडक बसली आणि रस्त्यावर पडल्याने प्रसादच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर पाठीमागून येणाऱ्या बसने रस्त्यावर पडलेली दुचाकी सुमारे शंभर फूट फरफटत नेली.
गावावर शोककळा
घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळ पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रसाद कोळेकर याच्या अपघाती मृत्यूने आरेवाडी गावावर शोककळा पसरली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा