आजकाल त्वचा आणि केसांच्या समस्यांवर उपचार घेण्यापूर्वी अनेकजण इन्स्टाग्रामवर माहिती शोधतात. विविध उपचारांचे व्हिडिओ आणि त्वचेची समस्या असलेल्या व्यक्तीचे आधीचे व उपचारानंतरचे फोटो पाहून त्याचे खुळ डोक्यात जाते. मात्र, सोशल मीडियावर दिसणारी माहिती आणि प्रत्यक्षात आपल्या त्वचेला किंवा केसांना आवश्यक असलेले उपचार यात फरक असू शकतो. त्यामुळे केवळ आकर्षक फोटो किंवा व्हिडिओ पाहून उपचार करण्याचा निर्णय घेऊ नका, असा सल्ला त्वचारोगतज्ज्ञांनी दिला आहे.
फॉलोअर्स नव्हे, पात्रता तपासा
केवळ डॉक्टरांचे फॉलोअर्स किंवा उपचारांची जाहिरात पाहून निर्णय घेण्याऐवजी डॉक्टरांची पात्रता, अनुभव आणि योग्य वैद्यकीय सल्ला यांना प्राधान्य देणे गरजेचे आहे. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे रुग्णांना त्वचारोगतज्ज्ञ आणि सौंदर्योपचार क्षेत्रातील तज्ज्ञांची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. मात्र, डिजिटल माध्यमांचा उपयोग केवळ फॉलोअर्स वाढवण्यासाठी किंवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी न करता, रुग्णांना योग्य माहिती देण्यासाठीही झाला पाहिजे. एखाद्या डॉक्टरांच्या पोस्टला किती लोकांनी पाहिले किंवा किती जणांनी फॉलो केले, यापेक्षा गरजू रुग्ण योग्य माहितीच्या आधारे योग्य तज्ज्ञांपर्यंत पोहोचला का, हेच रुग्णसेवेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे आहे.
उपचारापूर्वी हे जाणून घ्या
कोणताही सौंदर्योपचार घेण्यापूर्वी योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेऊन सर्व उपचारासंबंधी पर्याय समजून घ्यावेत. उपचार कशासाठी केले जातात, त्याचे संभाव्य दुष्परिणाम कोणते, किती काळ विश्रांती घ्यावी लागते आणि त्यातून कोणते परिणाम अपेक्षित असू शकतात, याची माहिती सोप्या भाषेत देणे आवश्यक आहे. ऑनलाइन दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष डॉक्टरांच्या सल्ल्यात सुसंगती असणेही तितकेच महत्त्वाचे आहे, कारण प्रत्येक रुग्णाची समस्या वेगळी असल्याने उपचार ठरवताना वैयक्तिक तपासणी आणि वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य दिले पाहिजे. सौंदर्योपचार क्षेत्रात रुग्णांचा विश्वास संपादन करण्यासाठी डॉक्टर आणि क्लिनिक यांनी पारदर्शक माहिती देणे आवश्यक आहे. उपचारांचे फायदे सांगतानाच त्याच्या मर्यादा आणि संभाव्य धोकेही स्पष्ट केले पाहिजेत. रुग्णांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांना वास्तववादी माहिती देणे आणि त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देणे ही डॉक्टरांची महत्त्वाची जबाबदारी आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा