जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील रजा कॉलनीत चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत सोन्याचे दागिने लंपास केले. घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी १ लाख ५६ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. २३ नोव्हेंबरच्या रात्री ते २४ नोव्हेंबरच्या सकाळदरम्यान ही घरफोडी झाली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२३ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते २४ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला. घरातील कपाटातून चोरट्यांनी ४५ हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ४५ हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, ४५ हजार रुपये किमतीचा १५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा तुकडा, तसेच २१ हजार रुपये किमतीच्या प्रत्येकी साडेतीन ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला.
पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी
घरफोडीची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घरमालकाच्या फिर्यादीवरून २४ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ) आणि ३३१ (४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास सुरू
या प्रकरणाचा पुढील तपास ग्रेड पोलीस उपनिरीक्षक विजयसिंग पाटील करत आहेत. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, परिसरातील माहिती गोळा केली जात आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा