बीड जिल्ह्यातील टाकरवन फाटा परिसरात स्कॉर्पिओ आणि आयशर टेम्पो यांच्यात झालेल्या भीषण अपघातात स्कॉर्पिओ चालकाचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमी स्कॉर्पिओ चालकाचा रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. संतोष रामभाऊ भुबे (वय ३४, रा. टाकरवन) असे मृत चालकाचे नाव आहे.
दुचाकीला धडक, मग टेम्पोवर आदळली स्कॉर्पिओ
गडी-सावरगाव मार्गावरील टाकरवन फाट्याजवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या स्कॉर्पिओने प्रथम एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने स्कॉर्पिओ पुढे असलेल्या आयशर टेम्पोवर जाऊन आदळली. या दुहेरी धडकेत स्कॉर्पिओचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
या अपघातात स्कॉर्पिओ चालक संतोष भुबे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी माजलगाव येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात येत होते. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.
दुचाकीस्वारावर उपचार सुरू; परिसरात हळहळ
दरम्यान, अपघातात दुचाकीस्वार ज्ञानेश्वर काळे (रा. धर्मेवाडी) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातामुळे टाकरवन परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कसा घडला, याबाबत पोलिस तपास करत आहेत.
प्रतिक्रिया व्यक्त करा