हिवाळा सुरू झाला की गरम आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची इच्छा होते. नेहमीची मेथीची भाजी करण्याऐवजी यावेळी मेथीचे चून करून पाहता येईल. विदर्भात पिठल्याला चून किंवा बेसन घोटणे असे म्हणतात. मेथीची पाने, बेसन, लसूण आणि हिरव्या मिरच्या यांपासून तयार होणारा हा पदार्थ चवीला खमंग लागतो आणि बनवायला सोपा आहे. गरम भात किंवा भाकरीसोबत तो उत्तम लागतो.
लागणारे साहित्य
एक जुडी ताजी मेथी, दीड वाटी बेसन, दोन छोटे कांदे, एक गाठ लसूण, तीन ते चार हिरव्या मिरच्या, मूठभर कोथिंबीर, कढीपत्ता, अर्धा चमचा जिरे, मोहरी, पाव चमचा हळद, शेंगदाणा तेल, चवीनुसार मीठ आणि आवश्यकतेनुसार पाणी.
बनवण्याची पद्धत
सर्वप्रथम मेथी निवडून घ्या. पाने स्वच्छ धुऊन पाणी पूर्णपणे निथळू द्या. या रेसिपीत मेथी चिरायची नाही; फक्त पाने देठापासून वेगळी करायची आहेत. कोवळी पाने वापरल्यास चव चांगली लागते आणि ती लवकर शिजतात.
लसणाचा वापर थोडा जास्त करायचा आहे. एक गाठ लसूण सोलून लहान तुकडे करा. दोन छोटे कांदे उभे पातळ कापा. कांद्यामुळे पिठल्याला छान चव आणि खमंगपणा येतो.
खलबत्त्यात मूठभर कोथिंबीर देठासहित घ्या. त्यात थोडा लसूण, अर्धा चमचा जिरे आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या घालून ठेचून घ्या. कोथिंबिरीच्या देठांमुळे वाटणाला छान सुगंध येतो. या रेसिपीत आले किंवा लाल तिखट वापरायचे नाही; हिरव्या मिरच्यांच्या ठेच्यामुळेच तिखट चव येते.
कढईत शेंगदाणा तेल गरम करा. त्यात मोहरी आणि जिरे घाला. मग चिरलेला कांदा आणि लसणाचे तुकडे घालून दोन ते तीन मिनिटे परता. नंतर कढीपत्ता घाला. तयार वाटण कढईत घाला; खलबत्त्यात थोडे पाणी घालून राहिलेले वाटणही काढून मिसळा. एक ते दोन मिनिटे परतून मेथीची पाने हाताने तोडून घाला. मेथी चिरण्याऐवजी हाताने तोडल्यामुळे तिचा नैसर्गिक पोत टिकतो. मेथी एक ते दोन मिनिटे परतून हळद घाला.
मेथी शिजल्यावर त्यात दीड वाटी बेसन घाला. बेसनाचा कच्चा वास जाईपर्यंत आणि खमंग सुगंध येईपर्यंत मंद आचेवर भाजा. बेसन आधी भाजल्यामुळे पिठल्याला छान चव येते आणि चिकटपणा कमी होतो. त्यामुळे गार झाल्यावरही त्याची चव आणि पोत चांगला राहतो. ही टिप आजीच्या काळापासून चालत आलेली आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा