प्रवासात रेल्वे उशिरा आली, तर अनेकदा आपण वेळेचे गणित बिघडले असे म्हणून सोडून देतो. पण जम्मू-काश्मीरच्या एका दाम्पत्याच्या बाबतीत रेल्वेच्या उशिरामुळे पुढचा प्रवासच हुकला. दुरांतो एक्सप्रेस चार तास उशिरा पोहोचल्याने त्यांची फ्लाइट चुकली आणि दिल्लीतच मुक्काम करावा लागला. या प्रकरणात ग्राहक न्यायालयाने रेल्वेला ६३ हजार १९९ रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम सहा आठवड्यांत द्यावी लागणार आहे.
१९ डिसेंबर २०२० ची घटना, चार वर्षांनंतर निकाल
मोहित सिंह भाऊ आणि त्यांच्या पत्नी जम्मू-काश्मीरहून दिल्लीला दुरांतो एक्सप्रेसने जात होते. त्यांना पुढे कनेक्टिंग फ्लाइटने गुवाहाटीला जायचे होते. १९ डिसेंबर २०२० रोजीची ही घटना आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी रेल्वे पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ती संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी पोहोचली. तोपर्यंत त्यांची फ्लाइट निघून गेली होती. त्यांना दिल्लीतच थांबावे लागले आणि पुढच्या प्रवासासाठी नवे तिकीट काढावे लागले. विमानाच्या तिकिटासाठी ३५ हजार ६९९ रुपये आणि हॉटेलसाठी २ हजार ५०० रुपये खर्च आला. त्यानंतर दाम्पत्याने ग्राहक न्यायालयात १ लाख ४० हजार रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली होती. सुमारे चार वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला.
धुक्याचे कारण न्यायालयाला पटले नाही
सुनावणीदरम्यान रेल्वेने धुक्यामुळे गाडीला उशीर झाल्याचे कारण दिले. मात्र, रेल्वे वेळेत न्यायालयाला उत्तर देऊ शकली नाही आणि उशिरामागचे कारण सिद्धही करू शकली नाही, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे दाम्पत्याला ६३ हजार १९९ रुपये देण्याचे आदेश देण्यात आले. ही रक्कम सहा आठवड्यांच्या आत जमा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. रेल्वेच्या उशिरामुळे प्रवाशाला झालेल्या त्रासाची दखल घेत न्यायालयाने हा निर्णय दिला असून, या निकालाची चर्चा होत आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा