अमेरिकेने इराणमध्ये असलेल्या आपल्या नागरिकांना तात्काळ इराण सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत. इराणमधील अमेरिकी व्हर्च्युअल एम्बेसीने अमेरिकन नागरिकांनी इराणचा प्रवास करू नये आणि जे आधीपासून तिथे आहेत त्यांनी शक्य तितक्या लवकर देश सोडावा, असा इशारा दिला आहे. अमेरिकेच्या या अलर्टमुळे जगभर खळबळ उडाली आहे.
हल्ल्याची भीती आणि प्रवासावर परिणाम
अमेरिकेने आपल्या नागरिकांना इराण सोडण्यास सांगितल्यामुळे मध्य पूर्वेत आणि अमेरिकेच्या ठिकाणांवर मोठा हल्ला होण्याचे संकेत मिळत असल्याचे सांगितले जात आहे. इराण समर्थित हूती बंडखोरांचे हल्ले आणि इराणकडून अमेरिकन अधिकारी व ठिकाणांना निशाणा बनवले जाण्याची शक्यता असल्याने तणाव वाढू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
इराणने बहरीन आणि कुवैतमध्ये अमेरिकन ठिकाणांना लक्ष्य केल्याचे सांगितले जात आहे. तर हूतींच्या हल्ल्यात सौदी अरेबियातील विमानतळ आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात अनेक जण जखमी झाले असून हवाई सेवा प्रभावित झाल्याचे सांगण्यात येत आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता असल्याने उड्डाणे रद्द होणे, हवाई क्षेत्र बंद होणे आणि प्रवासात अडथळा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अमेरिकन नागरिकांनी एअरलाइन्सच्या संपर्कात राहावे, निदर्शने आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहावे, ज्या ठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने असतील तिथे जाऊ नये आणि स्थानिक प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अलर्ट सिस्टिममध्ये नोंदणी करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
१९८० पासून राजनैतिक संबंध नाहीत
अमेरिका आणि इराण यांच्यात १९८० पासून कोणतेही राजनैतिक संबंध नाहीत. इराणमध्ये अमेरिकेच्या हितांचे प्रतिनिधित्व स्वित्झर्लंड करते. आपत्कालीन स्थितीत नागरिकांनी तेहरानमधील स्विस दूतावासाच्या अमेरिकन हित विभागाशी संपर्क साधावा, असा सल्ला देण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत मध्यावधी निवडणुका झाल्या. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मोठी हार पत्करावी लागली. त्यामुळे अमेरिकेची धोरणे बदलतील आणि इराणसोबतचे युद्ध टळेल, असे अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र ट्रम्प यांचा दृष्टिकोन बदललेला दिसत नाही आणि त्यांनी इराणला धडा शिकवण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. इराणने अमेरिकन ठिकाणांवर हल्ला केल्यास अमेरिका काय प्रत्युत्तर देणार, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा