बुलढाणा जिल्ह्यातील महिला बचत गट, लघुउद्योजिका आणि पथविक्रेत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, खाद्यव्यवसायातील स्वच्छता आणि सुरक्षितता यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले. ग्राहकांचा विश्वास हीच कोणत्याही व्यवसायाची खरी ताकद असते, त्यामुळे सुरक्षित आणि दर्जेदार खाद्यपदार्थांच्या माध्यमातून उत्पादनांना व्यापक बाजारपेठ मिळवून द्यावी, असेही ते म्हणाले.
शेगावमध्ये प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम
जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाच्या अनुषंगाने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या पश्चिम विभागाच्या सहकार्याने शेगाव येथे पथविक्रेते, महिला बचत गट आणि लघुउद्योजिकांसाठी प्रशिक्षण व जनजागृती उपक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात जाधव बोलत होते.
या वेळी प्राधिकरणाच्या पश्चिम विभागाच्या प्रादेशिक संचालिका प्रीती चौधरी, उपसंचालक वैद्यही काळझुणकार, सहायक संचालक ज्योती हरणे, तहसीलदार प्रज्ञा काकडे, शेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, लघुउद्योजिका आणि पथविक्रेते उपस्थित होते.
महिला बचत गटांनी आपल्या उत्पादनांची गुणवत्ता, स्वच्छता आणि पॅकेजिंग सुधारण्यावर भर द्यावा, असे जाधव यांनी सांगितले. खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी सुरक्षित अन्न हाताळणीचे नियम पाळावेत आणि आवश्यक नोंदणी व परवाने घ्यावेत. प्रशिक्षणानंतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या व्यावसायिकांना मार्गदर्शन व सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विकास, रोजगार आणि सर्वसामान्यांच्या कल्याणाशी संबंधित उपक्रम राबवण्यात येत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेगाव-शिर्डीत प्रत्येकी एक कोटींचा निधी
शेगावच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण माहिती देताना जाधव यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या ‘१०० फूड स्ट्रीट्स’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील शेगाव आणि शिर्डी या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांची निवड करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी एक कोटी रुपयांच्या निधीतून आधुनिक, स्वच्छ आणि सुरक्षित ‘हेल्दी अँड हायजिनिक फूड स्ट्रीट’ विकसित करण्यास मंजुरी मिळाली आहे.
या उपक्रमामुळे भाविकांना सुरक्षित खाद्यसुविधा उपलब्ध होण्यासोबतच स्थानिक विक्रेते, महिला उद्योजिका आणि छोट्या व्यावसायिकांच्या व्यवसायालाही चालना मिळणार आहे. धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्याने तेथील खाद्यव्यवसायाला सातत्याने मागणी राहते. त्यामुळे हा उपक्रम स्थानिक अर्थव्यवस्थेसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रतिक्रिया व्यक्त करा